'...आमचे छत्रपती वाचवले'; अजित पवारांच्या वाक्याने पिकला एकच हशा! उदयनराजेंबद्दलचं विधान चर्चेत

Maharashtra Assembly Election Ajit Pawar On How Udayanraje Bhosale: फलटणमधील जाहीर सभेमध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 10, 2024, 09:12 AM IST
'...आमचे छत्रपती वाचवले'; अजित पवारांच्या वाक्याने पिकला एकच हशा! उदयनराजेंबद्दलचं विधान चर्चेत title=
जाहीर सभेत केलं विधान

Maharashtra Assembly Election Ajit Pawar On How Udayanraje Bhosale: फलटण येथील जाहीर सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. पिपाणी आणि तुतारी या निवडणूक चिन्हांसंदर्भात अजित पवारांनी साताऱ्यामधील निवडणुकीचा संदर्भ देत सूचक विधान केलं आहे. 'तुतारी' पेक्षा 'पिपाणी'ची किमया मोठी आहे. पिपाणीमुळे आमचे छत्रपती वाचले. त्यामुळेच पिपाणीचा फार मोठा धसका अनेकांनी घेतला आहे, असं अजित पवार म्हणाले. पक्षाचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते.

नक्की घडलेलं काय?

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक फारच चुरशीची झाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक लढवली होती. तर भारतीय जनता पार्टीने उदयनराजे भोसलेंना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये सदर मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे संजय गाडेही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचे निवडणूक चिन्ह 'ट्रम्पेट' म्हणजेच स्थानिक भाषेत पिपाणी हे होते. गाडे यांना अपेक्षितपणे तब्बल 37 हजार मतं मिळाली होती. मतदान करताना अनेकांचा पिपाणी आणि तुतारीमध्ये गोंधळ झाल्याने गाडेंना इतकी मतं मिळाल्याची चर्चा साताऱ्यासहीत आजूबाजूच्या परिसरामध्ये रंगली होती. याचाच संदर्भ अजित पवारांनी शनिवारी शाब्दिक कोटी करताना दिला. विशेष म्हणजे उदयनराजे भोसलेंनी ही निवडणूक अवघ्या 32 हजार मतांनी जिंकली होती. पिपाणी आणि तुतारीमध्ये गोंधळ झाला नसता तर वेगळा निकाली लागला असता अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. 

नक्की वाचा >> पुणे हादरलं! शरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण करुन अश्लील Video काढून...

पिकला एकच हशा

"'पिपाणी'ची फार मोठी किमया आहे. त्यामुळेच अनेकांनी या चिन्हाची दहशत घेतली आहे. काही लोकांनी या चिन्हाविरपुद्ध निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत. अशी ही पिपाणी जिने आमच्या छत्रपती उदयन महाराजांना वाचविले," असं विधान अजित पवारांनी जाहीर सभेत केल्यानंतर एकच हशा पिकला. आपल्या मिश्किल शैलीमध्ये अजित पवारांनी हे विधान केलं असलं तरी सभेनंतरही या विधानाची चर्चा राहिली. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे साताऱ्यात भाजपाची सीट थोड्यात निवडून आल्याचं मान्य केल्याची सर्चा समर्थकांमध्ये आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर शरद पवारांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे ट्रम्पेट या चिन्हचं मराठीत भाषांतर केलं जाऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत मुक्त चिन्हाचे वाटप करत असतांना ट्रम्पेटचे मराठी भाषांतर तुतारी न करता ट्रम्पेट ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत."Trumpet" या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरीत नाव तुतारी ऐवजी 'ट्रम्पेट'च राहील अशी सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे.