Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात प्रचाराची रणधुमाळी उडाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांसहीत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभाही चर्चेत आहेत. राज ठाकरे आपल्या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल करताना दिसत आहेत. तुम्ही पाच वर्षांपूर्वी दिलेलं मत आता कुठे फिरतंय तुम्हाला माहितीये का? असं राज ठाकरे मतदारांना विचारत आहेत. असं असतानाच दुसरीकडे ते सत्तेत आणि विरोधात असलेल्यांनी वाटेल तसं संग्नमत करुन युती आणि आघाडी केल्याचं राज ठाकरेंनी आतापर्यंतच्या सभांमध्ये म्हटलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी विक्रोळीत घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी पक्षांमधील फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बोलताना आपल्याला काँग्रेसमध्ये जाण्याची ऑफर होती असा गौप्यस्फोट केला आहे.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळेस त्यांनी आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. "मी लहान होतो. आमचे गाडीचे माने नावाचे चालक होते. तुळशी रोड नावाचा एक रोड आहे. तिथे शिवसेनेचे कार्यालय होते, मला बाळासाहेबांनी घेतलं आणि आम्ही निघालो तिकडे जाण्यासाठी. तेव्हा माने आले नव्हते. आम्ही टॅक्सी केली. आम्ही चाललो होतो तेव्हा ट्रॅफिक नव्हतं. ही साधारण 73-74 सालची गोष्ट असेल. महापौर यांची इम्पाला गाडी आली. सुधीर भाऊ आले. त्यांचे बाळासाहेबांशी काम होते. ते बाळासाहेबांना बोलले मी सोडतो तुम्हाला. तेव्हा बाळासाहेब बोलले, 'मी लाल दिव्याच्या गाडीत नाही बसणार.' आमची टॅक्सी निघाली तेव्हा वांद्रा येथे मागे पाहिलं तर लाल गाडी मागून येत होती. ज्याने लहानपणी असे पाहिलं तो बसेल का लाल दिव्याच्या गाडीत? मात्र एकाने ज्यांच्या विरोधात लढला त्याच्यासोबत मुख्यमंत्रीपदसाठी जाऊन बसला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ढेंगेखालून 40 आमदार गेले," असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
पुढे बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला. "शिंदे आले ते म्हणाले अजित पवार असतील तिथे मी बसणार नाही. अचानक भाजपने दुसरीकडे डोळा मारला. मांडीला मांडी लावून बसणार नव्हते ते आता मांडीवर येऊन बसलेत. तुम्ही लाचारासारखे यांना मतदान करताय. तुम्हाला गृहीत धरले जात आहे. एक दिवस जगलात मतदानाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मेला तरी चालेल. ही 2024 ची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही निवडणूक ठरवणार आहे की त्यांनी जे केलं ते बरोबर आहे की चूक हे तुम्ही ठरवणार आहात," असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं.
"ग्रामीण भागातील मुले मुंबई पुण्यात येतात आणि तिथली मुलं विदेशात जातं आहेत. सगळीकडे बोजवारा सुरू आहे. त्याचवेळी यांचे राजकीय खेळ सुरू आहेत. बाळासाहेब म्हणाले होते माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस झाली तर शिवसेना नावाचे दुकान बंद करेल आणि त्यांचे चिरंजीव, आमचे बंधू हे काँग्रेसच्या पांजाचा प्रचार करत आहेत," असा टोला राज यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
"मला काही गोष्टी पटल्या नाहीत, मी बाहेर पडलो. 35 आमदार, 15 खासदार आले होते माझ्याकडे. मला म्हणाले, 'जाऊ काँग्रेससोबत', पण मी नाही म्हणालो. शिवसेना फोडून मला काही करायचे नव्हते," असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना, "महाराष्ट्रातील इतर पक्षांनी काय केले? कोणाच्या आणि कोणत्या आधारावर त्यांना तुम्ही मतदान करतात हे मला कळत नाही. बाळासाहेबांच्या नावाने मत मागतात. आज मी तुमच्याकडे मत मागायला आलो ते माझ्या जीवावर आलो. त्यांना अजूनही मत मागायला फोटो लावावा लागतोय," असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेला लगावला.