Khed Shivapur Toll 5 crore Recovered From Car: खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीत सोमवारी रात्री तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असतानाच एवढ्या मोठा प्रमाणात रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशातच आता यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याचदरम्यान ज्या गाडीमध्ये ही रक्कम आढळून आली त्याबद्दल मोठा खुलासा समोर आला आहे. तसेच हे पैसे कोण आहेत या संदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे पोलिसांनी ही 5 कोटींची रक्कम जप्त केली आहे.
निवडणुक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राजगड पोलीस स्टेशनमध्ये ही रक्कम जप्तीची कारवाई करण्यात आली. पहाटे 4 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीमधून ही संशयास्पद रक्कम नेण्यात येत होती. ही गाडी अमोल शहाजीराव नलावडे यांच्या मालकीची असून ही गाडी एका बांधकाम व्यावसायिकाकडे असते. गाडी पकडण्यात आली त्यावेळी गाडीमध्ये 4 जण होते. ते सर्व एका आमदाराचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे पहाटेपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम की कुणाची आणि कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती याबाबतचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आलेला नाही. जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत समाधानकारक खुलासा न होऊ शकल्यास गुन्हा दाखल करण्यासह पुढील कारवाई होईल, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस किंवा आयोगाच्या पथकाकडून या घटनेबद्दल अजून पर्यंत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नक्की वाचा >> खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडली 50000000 रुपयांची कॅश! राऊत म्हणतात, 'शिंदेंनी निवडणुकीसाठी...'
दरम्यान ज्या, MH 45 AS 2526 इनोव्हामध्ये ही एवढी मोठी रक्कम आढळून आली ती कार आपण यापूर्वीच विकल्याची माहिती कारचे कागदोपत्री मालक असलेल्या अमोल नलावेड यांनी दिली आहे. जून महिन्यात आपण बाळासाहेब आसबे या व्यक्तीला सदर वाहन विकले आहे असं गाडी नावावर असलेल्या अमोल नलावडे यांनी खुलासा करताना म्हटलं आहे. अद्याप वाहन कागदपत्र हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आपले नाव समोर आले असले तरी ही घटना आणि रोख रकमेशी आपला संबंध नसल्याचा नलवडे यांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या पाच कोटींच्या रक्कमेवरुन आपल्या एक्स अकाऊंटवरुन बातमीचा व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. "मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड-शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटी सापडले! (प्रत्यक्षात 5 कोटी रुपये) हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू... किती हे खोके?" अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे.