मुंबई : भाजपाच्या धक्कादायक निकालांनंतर मित्रपक्षांच्या महत्त्वाकांक्षांनाही कंठ फुटला आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदस आठवले यांनी आपल्या पक्षाला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदाची रामदास आठवलेंची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. त्यावेळी मंत्रीपदावर चर्चा होईल असेही ते म्हणाले.
२२० च्या वर आम्ही जाऊ अशी आम्हाला अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. पण आमचे सरकार येईल. आमचा मुख्यमंत्री बनेल. माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. आमच्या पक्षाला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी यावेळी आठवलेंनी केली.
निवडणूक निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाच्या नेत्यांना २२० पार जाणार असल्याचा आत्मविश्वास होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी देखील झी २४ तास शी बोलताना हा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे शिवसेनेने देखील अबकी बार १०० पार चा नारा दिला. तसेच आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणले. काँग्रेस-राष्ट्रवादीला महासंपवण्याची विधान भाजपा नेत्यांनी प्रचारसभेतून केली. कलम ३७० चा मुद्दा भाजपाने आपल्या प्रचारात प्रामुख्याने आणला. पण प्रत्यक्षात निकाल महायुतीला अनपेक्षीत असा लागला. भाजपाचे १०४ तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या अपेक्षांना अर्ध्यावर आणून ठेवले.
त्यानंतर आता भाजपाच्या मित्रपक्षांच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. निकालाचे कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाला गर्भित इशारा दिला. चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्यावरून जागावाटपावेळी आम्ही भाजपाला समजून घेतलं पण आता मला माझा पक्ष चालवायचाय असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता मंत्रीपद देताना मित्रपक्षांना खुश ठेवणे हे भाजपासमोर मोठे आव्हान असणार आहे.