बापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित... नेमकं काय घडलं?

बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एका महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या आढळल्या असून त्यामुळं डॉक्टरही अचंबित झालेत. या अळ्या तिच्या डोळ्यात कुठून आल्या? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

राजीव कासले | Updated: Aug 8, 2024, 09:18 PM IST
बापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित... नेमकं काय घडलं? title=

मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा :  डोळा हा शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. पण अनेकदा डोळ्यांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा केला जातो. हाच हलगर्जीपणा एका महिलेच्या आरोग्यावर बेतला.  बुलढाणा जिल्ह्यातील चिखली जवळ असलेल्या मालगणी इथं राहाणाऱ्या ज्योती गायकवाड या महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या (Live Larvae) आढळल्या. ज्योती गायकवाड मालगणी गावात शेतात काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मातीचा (soil) ढेकूळ उडाला. त्यांनी त्याकडं सुरूवातीला दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर डोळे दुखू लागल्यानंतर घरगुती उपाय केलं. मात्र त्यांच्या डोळ्यात अळ्यांसारखं काहीतरी दिसू लागल्यानं कुटुंबीयांना धक्काच बसला...

डॉक्टरही झाले अचंबित
डोळयात जास्तच आग पडल्यानं पाच ते सहा तासांनी ज्योती गायकवाडांच्या कुटुंबीयांनी त्यांना नेत्ररोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. महिलेच्या डोळ्यात तब्बल 60 जिवंत अळ्या आढळल्यानं डॉक्टरांचेही डोळे चक्रावून गेले. डॉक्टरांनी तात्काळ महिलेच्या उपचार करत डोळ्यातील सर्व अळ्या बाहेर काढल्यात. या अळ्या काढल्या नसत्या तर त्यांची दृष्टी जाण्याची भीती होती, असं डॉक्टरांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?
ज्योती गायकवाड या शेतात काम करत असताना गवताला असलेली माती डोळ्यात उडाली. पण ज्योती यांनी हाताने डोळा चोळला आणि दुखण्याकडे दुर्लक्ष करत शेतात काम सुरू ठेवले. काम आटोपल्यानंतर ज्योती घरी परतल्या. घरी गेल्यानंतरदेखील डोळ्यात दुखत असल्याने घरगुती उपाय म्हणून त्यांनी डोळा पाण्याने धुतला, पण यानतंरही डोळ्यात आग होत असल्याने त्यांनीर घरात असलेला एक डोळ्यांचा ड्रॉप वापरला. या सर्वात तब्बल पाच तास गेले. 

पाच ते सहा तासाने डोळ्याचं इन्फेक्शन वाढल्याने शेवटी कुटुंबियांनी त्यांना डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी तात्काळ डोळ्याचे निरीक्षण करून अँटिसेप्टिक वापरले आणि दुर्बीणीतून जेव्हा डोळा बघितला त्यावेळी डॉक्टरांनाही धक्का बसला. कारण डोळ्यात जिवंत अळ्या फिरत होत्या. 

ज्योती गायकवाड यांनी आणखी काही वेळ उशीर केला असात तर अळ्या डोळ्यापासून कदाचित मेंदूपर्यंतही जाऊ शकल्या असता. त्यामुळं डोळ्यांना काही झाल्यास घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. अन्यथा दृष्टी कायमची गमावण्याची वेळ येऊ शकते.