'मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला...', मेडलसह स्वप्निल कुसाळेने काळीजही जिंकलं, म्हणतो...

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे मायदेशी परतला असून पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. पुण्यात पाऊल ठेवताच स्वप्निलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

सौरभ तळेकर | Updated: Aug 8, 2024, 05:33 PM IST
'मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला...', मेडलसह स्वप्निल कुसाळेने काळीजही जिंकलं, म्हणतो... title=
Olympic medalist Swapnil Kusale

Swapnil Kusale Pune Rally : महाराष्ट्राला 72 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं. खाशाबा जाधव यांच्यानंतर आता स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक (Bronze medal) पटकावलं. स्वप्निलच्या यशामुळे भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळवता आलंय. त्यामुळे आज प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाला स्वप्निलचा अभिमान वाटतोय. स्वप्नील पॅरिसमधून मायदेशी परतला असून त्याने पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं. पुण्यात पाऊल ठेवताच स्वप्निलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर बालेवाडीमध्ये त्याची विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. त्यावेळी स्वप्निलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाला स्वप्नील कुसाळे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा मला अभिमान वाटतो. मला माझ्या देशासाठी पदक जिंकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असं स्वप्नील कुसाळे याने म्हटलं आहे. एवढ्या वर्षांनी मोठ्या व्यासपीठावर देशासाठी आणि राज्यासाठी पदक जिंकण्याची संधी मला मिळाली, असं म्हणत त्याने कृतज्ञता देखील व्यक्त केली. 

मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकल्याने आता महाराष्ट्राच्या खात्यात दोन पदकं आली आहेत. त्यामुळे आता आगामी ऑलिम्पिक्ससाठी महाराष्ट्राकडून आणखी खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा केली जात आहे.  

दरम्यान, महाराष्ट्राच्या अविनाश साबळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपयश आलं. 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या तो अंतिम फेरीत पोहोचला होता. त्याची सुरुवातही चांगली झाली. मात्र नंतर तो शर्यतीत मागे पडला. अविनाश साबळे अकराव्या स्थानी राहिला. 

72 वर्षांची प्रतिक्षा खंडीत

स्वप्निल कुसळेची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान गाजवणाऱ्या स्वप्निलचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदर मिळवून दिलं आहे तर महाराष्ट्राला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. महाराष्ट्रात ऑलिम्पिक मेडल येण्यासाठी तब्बल 72 वर्षे लागली. पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील समर ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत ब्राँझ पदक पटकावले होते.