सोलापूर : नांदेडच्या शासकीय रुग्णालायत गेल्या 48 तासात मृत्यूचं (Death) तांडव पाहिला मिळालं. दोन दिवसात तब्बल 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. या घटनांनी राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील सुविधांवर प्रश्नचिन उपस्थित केला जात असताना आता खुद्द आरोग्य मंत्र्यांच्याच (Health Minister) मतदारसंघात एका बालकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या भूमपरांडामध्ये ऑक्सिजनअभावी (Oxygen) अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भूमच्या शासकीय रुग्णालयातली (Government Hospital) ही धक्कादायक घटना आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने आणि ऑक्सिजन लावला नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. राज्यात नांदेड, नागपूरमध्ये रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळतंय. आणि आता खुद्द आरोग्य मंत्र्यांच्याच मतदारसंघात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे राज्याची आरोग्य व्यवस्थाच मुर्दाड झालीय का असाच प्रश्न आता सामान्य विचारतायत.
नाशिकमध्ये हादरवणारी घटना
नाशिकमध्येही एक हादरवणारी घटना घडली आहे. नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीदरम्यान बाळ हातातून निसटून बाळाचा मृत्यू झाला. फाल्गुनी जाधव ही महिला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात आली होती. तेव्हा गर्भातल्या बाळाचे ठोके अपेक्षित होते. मात्र डिलिव्हरी करताना विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं जात होतं. या प्रशिक्षणादरम्यान बाळ हातातून निसटून खाली पडून मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या वडिलांनी केलाय. तर बाळ आधीच दगावल्याचा दावा रुग्णालयानं केलाय.
नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच आहे. शनिवारी नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर बाळाच्या आईचा आज मृत्यू झालाय. 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेची नॉर्मल प्रसूती झाली...मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली आणि आज तिचा मृत्यू झाला. बाहेरून 40 ते 45 हजारांची औषधं आणि रक्त आणूनही डॉक्टरांनी वेळेत उपचार केला नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. यावेळी महिलेच्या आईनं रुग्णालयातच टाहो फोडला.
नवजात बालकांची विक्री करणारी टोळी
मुंबईत नवजात बालकांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अशाच एकाच टोळीचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबईच्या गोवंडी-शिवाजी नगर परिसरात अनधिकृतपणे नर्सिंग होम थाटून गर्भवतींना पैशांचं आमिष दाखवून बाळांची विक्री केली जात होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि एजंट महिलांसह बोगस डॉक्टरला अटक केलीय. 5 लाखांत बाळाला विकण्यासाठी सौदा ठरला होता. पोलिसांनी रंगेहात पकडून नवजात बालकाची यांच्या तावडीतून सुटका केलीय. एजंट गोरीबी उस्मान शेख, बोगस डॉक्टर सायराबानो शेखशबाना झाकिर शेख, गुलाबशा मतीन शेख, ज्युलिया लॉरेन्स फर्नांडिस आणि रिना नितीन चव्हाण यांना अटक केलीय. या टोळीने अशा प्रकारे किती बाळांची विक्री केलीय? याचा तपास सुरू आहे.