Sambhaji Nagar : औरंगाबादचे (aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) असं करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे पत्र केंद्र सरकारने (Central Government) दिल्यानंतर राज्यसरकारचा नामांतरचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने शहरांनी नावे बदलण्याची अधिसूचना जारी केल्यानंतर औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर म्हणून ओळखला जाणार आहे. दुसरीकडे या नामांतराला एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी विरोध दर्शवला आहे. या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. यामध्ये औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आल्यानंतर या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. त्याबाबत आता खासदार जलील यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे.
गेल्या आठड्यात या उपोषणात औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आले होते. मात्र त्याला कोणीही आक्षेप घेतला नाही. त्यानंतर फोटो झळकावणाऱ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. मात्र या प्रकारामुळे नवा वाद पेटला. सर्वच राजकीय पक्षांनी एमआयएमच्या आंदोलनावरुन जोरदार टीका केली आहे. याबाबत आता इम्तियाज जलील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
औरंगजेब आमच्यावर का लादता?
आम्हाला औरंगजेबासोबत काही घेणं देणं नाही. त्याचा आमचा काही संबंध नाही. जसं शहराचे नामांतर आमच्यावर लादलं तसा औरंगजेब आमच्यावर का लादता असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. "औरंगजेबाची कबर जिथे हलवायची तिथं हलवा. पम आम्हाला विचारताय की सांगताय हे कळायला मार्ग नाही. जर आमची परवानगी हवी असेल तर त्याबाबत एक पत्र घेऊन या. मग बघू आम्ही परवानगी द्यायची की नाही," असे जलील यांनी म्हटलं आहे.
आमचं उपोषण नाही तर साखळी आंदोलन आहे - इम्तियाज जलील
"आमचं उपोषण नाही तर साखळी आंदोलन आहे. त्यामुळे तिथं रोजच जेवण होणार आहे. कदाचित माझं पहिल्या दिवशी मराठी चुकलं असेल आणि म्हणून मी उपोषण म्हणालो असेल. या शहरात कायदा व्यवस्था बिघडवण्याला आम्ही जबाबदार नाही. तुम्ही नामांतर आमच्या शहरावर लादता आणि उलट आम्हालाच शहराचे वातावरण बिघडवता असं म्हणता. हे योग्य नाही. आमचे आंदोलन शांतता प्रिय मार्गाने सुरु आहे. जो कोणी शांततेने आंदोलन करेल त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा असेल," असेही जलील म्हणाले.
औरंगजेबाची कबर काढून टाका
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) काढून टाकण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे संजय शिरसाट म्हणाले होते. "जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे असे लोकं उपोषणाच्या नावाखाली शहराला वेठीस धरण्याचे काम करत आहे. औरंगजेबाचे तुम्ही काय वंशज आहात का?" असा सवालही संजय शिरसाठ यांनी केला होता.