Madha Lok Sabha Constituency: सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यभरात आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. आता माढामधून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच सोलापूर मतदारसंघदेखील चर्चेत आहे. सोलापूरात भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संपत्ती जाहीर केली आहे.
भाजप उमेदवार रणजीत नाईक निंबाळकर, शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे कोट्यावधी रुपयांचे मालक आहेत. तर, भाजप उमेदवार राम सातपुते यांच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे. या उमेदवारांच्या संपत्तींवर एक नजर.
भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबीयांकडे 168 कोटी रुपयांची संपत्ती तर मोहिते पाटलांकडे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर, राम सातपुते यांच्याकडे 91 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर तीस कोटी तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 31 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
नाईक निंबाळकर यांच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे. मर्सिडीज, फॉर्च्यूनर गाड्यांची मालकी नाईक निंबाळकर कुटुंबीयांकडे. त्याचबरोबर राम सातपुते यांच्याकडे एक बुलेटसह तीन दुचाकी गाड्या, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावर एकही गाडी नाही.
सातपुते कुटुंबाकडे 100 ग्रॅम सोनं, साडेपाचशे ग्रॅम चांदी तर नाईक निंबाळकर कुटुंबियाकडे 77 तोळे सोने आणि मोहिते पाटील कुटुंबीयांकडे 897 ग्रॅम सोने असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली होती. त्यानंतर या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. 2006 ते 2014पर्यंत शरद पवार यांची मतदारसंघावर पकड होती. 2014 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते. तर, 2019 साली भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय खेचून आणला होता. या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व लक्षात घेता यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे दिली होती.