सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरुन चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केला आहे. भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट देखील होती. त्यामुळे आता मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे माढ्यातील वंचितच्या एका उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची सगळ्या जिल्ह्यात चर्चा सुरु झालीये.
माढा मतदारसंघातील अविवाहित तरूणांची लग्न करणं हेच माझं लक्ष असल्याचे वंचित बहुजन आघाडीचच्या उमेदवाराचे म्हणणं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातू उमेदवारी जाहीर होताच वंचितचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी अविवाहित तरुणांसाठी ही अफलातून घोषणा केली आहे. बारस्कर यांच्या या घोषणेची सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, शेती मालाचा हमीभाव या सारखे कळीचे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न समोर आहेत. मात्र वंचितच्या या उमेदवाराने मात्र या सर्व प्रश्नांना बगल देत, थेट अविवाहित तरूणांची लग्न लावून देणं हा माझ्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो मी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरूणांची वेळेवर लग्नं होत नाही. त्यामुळे समाजात मोठी समस्या निर्माण झाली आहे. 35 - 40 वर्षे उलटून गेली तरी अनेक तरूणांची लग्नं होतं नाहीत. लग्न होत नसल्याने तरूणांमध्ये नैराश्य आले आहे. इतर सामाजिक प्रश्नांपैकी हा देखील ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. अविवाहित तरूणांच्या लग्नांची वाढती समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे रमेश बारस्कर यांनी स्पष्ट केले.
"या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. महिलांच्या हाताला काम नाही. तरुण मुलांना लग्नाचं वय झालेलं असतानाही मुलगी मिळत नाहीये. लग्न करायच्या वयात तरुणांचे लग्न होत नाहीये. 35 वर्षे उलटून गेली 40 वर्षे आली तरी मुलांची लग्न होत नाही हा फक्त माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. या प्रश्नावर मी काम करणार आहे," अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांनी दिली.