डीजेच्या आवाजामुळं मृत्यू होऊ शकतो का?; तज्ज्ञ काय म्हणतात वाचा

Heart Attack Due To Dj: सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे दोन तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. यावर तज्ज्ञांनी काय सांगितलं हे जाणून घेऊयात.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 27, 2023, 05:16 PM IST
डीजेच्या आवाजामुळं मृत्यू होऊ शकतो का?; तज्ज्ञ काय म्हणतात वाचा title=
Loud music at ganesh immersion procession increases risk of heart attack

Heart Attack Due To Dj In Sangli: सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्यूहा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळं झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. अशावेळी डीजेच्या आवाजामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? असा सवाल उपस्थित होत आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया यामागील कारणे आणि उपाय. 

काय घडलं नेमकं? 

सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे. परवा सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पाडले. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी दोघांवर मृत्यू ओढावला आहे. दोघांपैकी एकावर 10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर गावातीच गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. तर, एक गावातील मिरवणुकीत सामील झाला होता. मिरवणूक सुरू असतानाच दोघही चक्कर येऊन पडले. त्यानंतर काहीच वेळाच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला असून याला  डीजेच्या दणदणाट कारणीभूत असल्याचे बोलले जाते. पण खरंच डीजेच्या आवाजामुळं मृत्यू होऊ शकतो का, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात पाहूयात. 

ध्वनीप्रदुषणामुळं हृदयविकाराचा झटका

आजकाल आपण बघतो की मिरवणुकांमध्ये सर्रास डॉल्बीचा वापर केला जातो. त्यामुळं ध्वनीप्रदुषण होते. ज्यावेळी आवाज जास्त असतो तेव्हा हृदयातील नसा या आंकुचन पावतात. त्यामुळं रक्तदाब वाढतो. ज्या लोकांना आधीपासून हृदयविकाराचा धोका आहे. त्यांना ध्वनिप्रदुषणामुळं हृदयाच्या नसा आंकुचित होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची व मेंदूचा पक्षाघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा लोकांनी जिथे जोरात डिजेचा आवाज आहे त्याठिकाणी जाणे टाळावे, अशी माहिती हृदयरोग तज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी दिली आहे. 

ध्वनीप्रदुषणामुळं हृदयविकाराचा धोका वाढतो

हृदय विकार आणि ध्वनी प्रदूषण यांचा थेट संबंध असल्याचे एका अहवालातून समोर आले होते. ज्या ठिकाणी गोंधळाचे आणि आवाजाचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच ध्वनी प्रदुषणाची तीव्रता अधिक आहे तिथल्या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या अधिक तीव्रतेने जाणवते. या परिसरातून हृदयविकाराचे प्रणाण 72 टक्क्यांनी वाढते. या अहवालानुसार 20 पैकी 1 मृत्यू हा ध्वनी प्रदुषणामुळं होते. 

जास्त प्रमाणात आवाज असल्यामुळं व्यक्तीच्या झोपेत व्यत्यय येतो. झोप पूर्ण न झाल्यामुळं ताण-तणाव वाढतो आणि त्यामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब्लड प्रेशर आणि मधुमेहाप्रमाणेच आता हृदयविकारांसाठी ध्वनीप्रदूषण कारणीभूत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रात्री झोपताना आवाजाची तीव्रता 30 डेसिबल आणि दिवसा 50 डेसिबलपर्यंत असावी. यापेक्षा जास्त आवाजाची तीव्रता असल्यात शरीरातील नसा आंकुचित होतात, हार्ट रेट वाढतो व रक्तदाब वाढण्यास सुरुवात होते.