मुली नको म्हणणा-यांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकार अनेक माध्यमातून प्रबोधन करत असल्याचं दिसून येत आहे.

Updated: Feb 14, 2018, 08:49 PM IST
मुली नको म्हणणा-यांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण title=

कोल्हापूर : मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकार अनेक माध्यमातून प्रबोधन करत असल्याचं दिसून येत आहे, पण पुरोगामी शहर अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात मुलींच्या जन्माचं केलेलं स्वागत मुली नको म्हणणा-यांसाठी डोळ्यात अंजन घालणारं आहे.

आनंदाचं वातावरण

राजारामपुरीतल्या बडवे कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचं स्वागत मोठ्या दणक्यात केलंय. निलेश आणि मीनाक्षी यांच्या पोटी जन्मलेल्या लहान परीचा स्वागत सोहळा खास कोल्हापुरी पद्धतीने पार पडला. या स्वागतासाठी सगळ्यांनी खास कोल्हापुरी फेटे बांधले होते. या मंगल क्षणी सनई चौघड्यांचे सुरही आनंदात भर घालत होते. 

३८ वर्षांनी मुलीचा जन्म

फुलांच्या पायघड्या, आतषबाजी अशा जल्लोषी वातावरणात रुग्णालयातून नव्या परीला घरी आणलं. बडवे कुटुंबात तब्बल ३८ वर्षांनी मुलीचा जन्म झाल्यानं घरातील सर्वांचा आंनद मावेनासा झालाय. त्यामुळं घरामध्ये एखादा सण असल्यासारखे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.