जालना : हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
गारपीटग्रस्त शेतक-यांना कर्जमाफीसारखे किंवा बोंडअळीच्या अनुदानासारखे अती निकष लावू नका, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. जालना जिल्ह्यामधल्या मंठा तालुक्यातल्या गारपिठीनं नुकसान झालेल्या पिकाची त्यांनी पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधला.
शेतक-यांच्या पंचनाम्याबाबत सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. २४ तासाच्या मुदतीमध्ये सरकारनं पंचनामे केले नाहीत तर राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी यानिमित्तानं दिला.