Loksabha Nivdnuk Nikal 2024 : भाजपच्या हिना गावित यांना 'दे धक्का', काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा दणदणीत विजय

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. भाजपनं विद्यमान खासदार डॉ. हिना गावितांना पुन्हा उमेदवारी दिली. तर काँग्रेसने अॅड. गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं होतं.

प्रशांत परदेशी | Updated: Jun 4, 2024, 05:06 PM IST
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : भाजपच्या हिना गावित यांना 'दे धक्का', काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा दणदणीत विजय title=

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. भाजपनं विद्यमान खासदार डॉ. हिना गावितांना (Heena Gavit) पुन्हा उमेदवारी दिली. तर काँग्रेसने अॅड. गोवाल पाडवी (Goval Padvi) यांना मैदानात उतरवलं होतं. पण हिना गावित यांचा जवळपास पावणे दोन लाखाच्या मतांनी पराभव दणदणीत पराभव झालाय. भाजपाचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना हा मोठा धक्का आहे. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी दणदणीत विजय मिळवलाय. काँग्रेसच्या बाल किल्ला ओळखला जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसच्या (Congress) हात बळकट झालेत. इथे मणिपूर ,संविधानात बदल आणि समान नागरी कायद्याबद्दल वाढलेला आदिवासींच्या रोष मतातून दाखवून दिला. गोवाल पाडवी हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, ही आघाडी गोवाल पाडवी यांनी शेवटपर्यंत टीकवून ठेवली.

काँग्रेसचा बालेकिल्ला
कधीकाळी नंदूरबार मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतरच्या 1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून 2009 पर्यंत नंदुरबारमधून काँग्रेसचाच खासदार निवडून आला. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित लागोपाठ 9 निवडणुका जिंकल्या. पण त्यानंतर बालेकिल्ला भाजपनं काबीज केला.

नंदूबारचा भौगलिक आराखडा
नंदुरबार, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा मतदारसंघ. नर्मदा आणि तापी नदीच्या विस्तीर्ण खोऱ्याचा भाग. तब्बल 67 टक्के आदिवासी लोकसंख्या. देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख देणाऱ्या आधार कार्ड प्रकल्पाची सुरूवात इथूनच झाली. राज्यातला पहिला मतदार याच मतदारसंघातून येतो. वर्षानुवर्षं इथल्या आदिवासी मतदारांना विकासाची स्वप्नं दाखवण्यात आली. मात्र ती कधीच प्रत्यक्षात उतरली नाहीत. सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. आदिवासी बालकांच्या पाचवीलाच कुपोषण पुजलंय. आदिवासी भागात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. बेरोजगारी आणि त्यामुळं होणारं स्थलांतर हा देखील मोठा प्रश्न आहे.

नंदुरबारचं राजकीय गणित
2009 मध्ये काँग्रेसच्या माणिकराव गावितांनी सपाच्या शरद गावितांचा 40 हजार मतांनी पराभव केला. मात्र 2014 च्या निवडणुकीआधी डॉ. विजयकुमार गावितांनी भाजपात प्रवेश केला. त्यांची कन्या डॉ. हिना गावितांना भाजपनं रिंगणात उतरवलं. डॉ. हिना गावितांनी माणिकराव गावितांसारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारून पहिल्यांदा भाजपचं कमळ फुलवलं. 2019 मध्ये डॉ. हिना गावितांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या के. सी. पाडवींना 95 हजार मतांनी हरवलं. आता काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा पराभव केला.