अपक्ष उमेदवार देणार नाही, 'सगेसोयरे'ला विरोध करणाऱ्यांना पाडा- मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

LokSabha Election: लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही, अशी घोषणा यावेळी मनोज जरांगेंनी केली. 

Updated: Mar 30, 2024, 05:54 PM IST
अपक्ष उमेदवार देणार नाही, 'सगेसोयरे'ला विरोध करणाऱ्यांना पाडा- मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन  title=
Manoj Jarange On Election

LokSabha Election: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली. दरम्यान सरसकट मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्याने नाराज असलेले मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी महत्वाची घोषणा केली आहे. 

लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही, अशी घोषणा यावेळी मनोज जरांगेंनी केली. ज्याला पाडायचंय त्याला पाडा. जो सगेसोयरे कायद्याला विरोध करेल त्याला पाडा, असे ते यावेळी म्हणाले. निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते पण त्यांच्यात ताकद असते ते पाडू शकतात.लोकसभा ही अंतिम लढाई नाही पुढे विधानसभेलाही आपल्याकडे वेळ आहे. आता कमी वेळ आहे. गावागावात समाज पोहोचला नाहीय. इतक्या कमी डेटावर मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे ते म्हणाले. 

माझा खरा मतदार गावखेड्यात आहे. पण कार्यकर्ते तिथे पोहोचले नाहीत. त्यामुळे शेवटच्या मराठ्याला काय म्हणायचंय, हे माझ्यापर्यंत पोहोचले नाही. आम्हाला गावखेड्यात जाऊन होतकरु मुले शोधायची आहेत. तोपर्यंत मराठा आरक्षणाची आग प्रत्येकाच्या डोक्यात धगधगते ठेवायचे आहे. मराठा समाजाला जिथे वाटेल त्या कोणालाही मतदान करा. पण आपली आरक्षणाची लढाई विसरु नका, याची आठवण जरांगेंनी करुन दिली. 

मनोज जरांगे निवडणूक लढवणार? मराठा समाजाचा कौल ऐकून जरांगेनी मांडली भूमिका

25 उमेदवार उभे करायचे असे म्हणताय पण इतका डेटा आहे का? तुमचे लोकसभेत नाव यावे यासाठी मी समाजाचे वाटोळे करणार नाही. माझी जात हरु नये म्हणून मी निर्णय घेतलाय. बाकी निर्णय तुमचा आहे, असे ते म्हणाले. 

राजकारणात उतरताना पूर्ण तयारीने उतरावे लागते. एखादा उमेदवार आम्ही उभा केला त्याला कमी मते पडली तर त्यावरुन आपल्याला हिणवले जाईल. बघा ही यांची ताकद असं म्हटलं जाईल,असे ते म्हणाले. 

अन्यायाचा बदला घ्या, तुमच्यावर केसेस पडल्यायत त्याचा बदला घ्या, असेही त्यांनी सांगितले.