Prakash Ambedkar: भाजप विरोध मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाईल असे वाटत असताना या चर्चांमध्ये मिठाचा खडा पडलाय. जागांच्या मुद्द्यावरुन या चर्चा फिस्कटल्या आहेत. प्रकाश आंबडेकरांनी मविआसमोर थेट 27 जागांचा प्रस्ताव ठेवला होता. प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नसल्याचे दिसून येतंय. प्रकाश आंबेडकांना यासंदर्भात अल्टिमेटम देण्यात आलाय. यानंतर महाविकास आघाडी स्वतंत्र निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पक्षाला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव कॉंग्रेससमोर ठेवलाय.
17 मार्च रोजी मुंबईतील 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या समापन महासमारंभात तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आपण विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणून पत्र लिहित असल्याचे आंबेडकर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत असल्याचे त्यांनी खर्गे यांच्या निदर्शनास आणून दिले.
शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला असल्याचे आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा – फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे. या विचाराने मी महाराष्ट्रातील 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पत्रातून म्हटलंय.
मला महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे ग्राउंडवर आणि धोरणात्मक पाठिंबा देईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.