कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला आहे. तसंच बॅनरवरुन उदय सामंत यांचं नाव हटवत किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे. यामुळे रत्नागिरीत भाऊबंदकीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. किरण सामंत लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने अद्यापही नाराज असल्याचं यानिमित्ताने बोललं जात आहे.
तळकोकणात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान ही उमेदवारी जाहीर होण्याआधी भाजपा-शिवसेनेत या मतदारसंघावरुन तिढा निर्माण झाला होता. याचं कारण शिंदे गटाने या जागेवर दावा केला असताना, दुसरीकडे नारायण राणेही माघार घेण्यास तयार नव्हते. पण अखेर सामंत बंधूंनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
पण किरण सामंत या निर्णयामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावरुन उदय सामंत यांचा फोटो हटवला आहे. रत्नागिरीत सामंत यांची जितकी कार्यालयं आहेत, त्या सर्वांवरुन त्यांचा फोटा काढून किरण सामंत यांचा फोटो लावण्यात आला आहे.
यावर उदय सामंत यांनी सावधगिरीची प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मोठ्या भावाचा गैरसमज होणार नाही, पण झाला असेल तर तो दूर करणं माझी जबाबदारी आहे असं ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. जर ते रागाने बोलले तर त्यांना हक्क आहे. ते माझे वडीलभाऊ आहेत असंही सांगत त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला.
पुढे ते म्हणाले की, "मला समाधान आहे की, माझा फोटो काढला असला तरी तिथे माझ्या मोठ्या भावाचा, एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. मोठ्या भावाच्या फोटोत जर मी माझं प्रतिबिंब पाहत असेन तर मला राग येण्याचं कारण नाही".
दरम्यान किरण सामंत आणि उदय सामंत यांच्यातील वादाचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जर शिवसेना आणि भाजपाने एकत्रित प्रचार केला नाही तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो. नारायण राणे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचं आव्हान असणार आहे.