LokSabha Election Result: सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vishal Patil) यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला (Congress) पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी विशाल पाटील यांनी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे पाठिंब्याचं पत्र सोपवलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विशाल पाटील यांनी उमेदवारीवरुन वाद झाल्यानंतरही काँग्रेसला पाठिंबा का दिला याचं कारणही सांगितलं.
विश्वजीत कदम यांनी सांगितलं की, "मी आणि सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आम्ही दोघांनी मल्लिकार्जून खरगे, के सी वेणुगोपाल, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. विशाल पाटील यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आज खासदार म्हणून इंडिया आघाडीच्या पाठीशी राहणार असून, तसं लेखी पत्र दिलं आहे".
"निवडून आलेले खासदार विशाल पाटील काँग्रेस पक्षाचे कार्यक्रते, नेते आहेत. नाईलाजाने त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. सांगलीच्या जनतेने, लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं आहे," असंही त्यांनी सांगितलं.
विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं की, "आम्ही स्वत:हून कांग्रेस पक्षाचे आभार मानले. त्यांनी मला उमेदवारी मिळावी यासाठी अटीतटीचे प्रयत्न केले. माझ्यावर एवढं प्रेम असल्याने बिनशर्त पाठिंबा असल्याचं पत्र खरगे यांच्याकडे सोपवलं आहे. यापुढील काळात आम्ही काँग्रेस पक्षासोबतच संसदेत काम करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचीही भेट घेऊन पाठिंबा देत असल्याचं कळवलं. तसंच पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला".
सांगलीकरांना आपल्यामुळे देशात काँग्रेसचं शतक पूर्ण झाल्याचा आनंद आहे असंही विश्वजीत कदम म्हणाले. लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचं विशाल पाटील यांच्या समर्थनानंतर शतक झालं केलं आहे. इंडिया आघाडीने देशात 233 जागा जिंकल्या असून यामध्ये काँग्रेसच्या 99 जागा होत्या.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 9 तर शरद पवार यांच्या पक्षाने 8 जागांवर विजय मिळवला.विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिल्याने महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या नावे 31 जागा झाल्या आहेत.