Narayan Rane On Devendra Fadanvis: भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या पक्षप्रवेशाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. शिवसेना, कॉंग्रेस नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणेंनी आपल्या पक्ष प्रवेशात देवेंद्र फडणवीसांचा कसा सहभाग होता, याबद्दल वक्तव्य केलंय. काय आहे हा किस्सा? जाणून घेऊया.
नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. नारायण राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आले आहेत. याचा फायदा वेळोवेळी फडणवीस पर्यायाने भाजपला झाला. नारायण राणेंच्या रुपाने कोकणात ताकद असलेला मराठा चेहरा भाजपला मिळाला. पण नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावेळी नेमकं काय झालं होतं? याचा उलगडा आता अनेक वर्षांनी झालाय
देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणे म्हणाले. 'भाजप मध्ये या' असं भर रस्त्यात देवेंद्र फडणवीसांनी मला विचारलं. 'मी एका पक्षाचा नेता आहे, रस्त्यावर विचारानं योग्य नाही', असं राणे म्हणाले. यानंतर चर्चा करून मी भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणेंनी सांगितले.
मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो. पद मिळवण्यासाठी त्या लायकीचा बनण्याचा प्रयत्न करतो, असेही राणे पुढे म्हणाले.
मुंबई भाजपा अध्यक्ष कोकणात दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोकणात प्रचार मोहिमेत भाजपाची आघाडी पाहायला मिळत आहे. कोकणातून अजून महायुतीचे उमेदवाराचं नाव जाहीर नाही.मात्र येथे भाजपाच पारडं जड आहे. कोकणात शिवसेनेतून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उमेदवार म्हणून इच्छुक होते. पण नारायण राणेंना पक्षाकडून हिरवा कंदील मिळाला. यानंतर स्वत: नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये प्रचार करत आहेत.
उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. महायुतीमध्ये अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाहीये. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नाते नारायण राणे तर शिवसेनेकडून किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा संदर्भातच चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. आता या चर्चेत काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.