Uddhav Thackeray Modi Government: लोकसभा निवडणूक 2024 च्या एक्झिट पोलच्या आकेडवारीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला तिसऱ्यांदा बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्येही महायुतीचे वर्चस्व राहील असं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर अमरावतीचे आमदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारमध्ये सहभागी होतील असं मत नोंदवलं आहे. राणा यांच्या या विधानावर ठाकरे गटानेही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर उद्धव ठाकरे 15 दिवसात सरकारमध्ये शामिल होतील' असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा यांनी केलेल्या याच दाव्याचा संदर्भ देत ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांना आज (3 जून 2024) एका पत्रकाराने प्रश्न विचारला. राऊतांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अगदी तोंड वाकडं करत खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. "कोण रवी राणा? काय सकाळी सकाळी नावं घेत आहात. त्यांचा देशाच्या राजकारणाशी कधी संबंध आला?" असा उलट प्रश्न पत्रकाराला विचारला.
पुढे बोलताना राऊत यांनी राणा यांचा उल्लेख 'ऐरा-गैरा' असा केला. "शिवसेना हा या देशातील राजकारणामधील सर्वात जुना पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. उद्धव ठाकरे 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. या पक्षाचे स्वत:चे 18 खासदारसुद्धा निवडून आले आहेत. परत निवडून येतील. अशा पक्षांच्या भूमिकेवर कोणी ऐऱ्या गैऱ्याने बोलावं हे बरोबर नाही. तुम्ही तुमचं बघा. लोकशाही मार्गाने निवडणुका लढा. आमच्या नादाला लागू नका. आम्ही एकत्र बसून काय तो निर्णय घेऊ. त्याप्रमाणे पक्षप्रमुख ठरवतील," असं संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> 'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'
तसेच पोस्टल व्होट्सची मोजणी आधी केली जावी अशी मागणी काँग्रेसने केल्याचा संदर्भ देत राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी आधी व्हावी आणि त्याचा निकाल आधी लागावा अशी इंडिया आघाडीची मागणी आहे. पोस्टाने आलेल्या मतांचा ट्रेण्ड हा फार महत्त्वाचा असतो. राजस्थानच्या विधानसभा मतमोजणीमध्ये पोस्टाने आलेल्या मतांच्या मोजणीत काँग्रेस पुढे होती. नंतर अचानक ट्रेण्ड बदलले. ते कसे बदलले ठाऊक नाही," असं सूचक विधान केलं.