Loksabha Election 2024 Uddhav Thackeray First List: महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 17 मतदारसंघांमधील उमेदवार उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले आहेत.
बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघामधून संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांचा दबदबा असलेल्या मावळ मतदारसंघामधून उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात संजोग वाघेरे पाटील यांना उतरवण्यात आलं आहे. सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोलीतून नागेश पाटील-अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
संभाजीनगर हा उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली जाणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार याबद्दल चर्चा होत्या. अखेर या मतदारसंघातील उमेदवाराचं नावाच्या चर्चेला पहिल्याच यादीत पूर्णविराम लावत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. धाराशीवमधून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंच्या पक्षाची मशाल घेऊन उतरणार आहेत. नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गितेंना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघातून राजन विचारे ठाकरे गटासाठी निवडणूक लढवणार आहेत. संजय जाधव यांना परभणीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.
ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. तर दक्षिण मुंबईमधून विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. वायव्य मुंबईमधून अमोल कीर्तिकर निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाईंना उमेदवारी जाहीर झाली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीसहीत ठाकरे गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीतील 16 उमेदवारांसहीत संजय राऊतांनी 17 वं नाव सोशल मीडियावरुन जाहीर केलं आहे. यादीमध्ये 16 नावं असली तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.' एकूण 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव- ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक- राजाभाऊ वाजे
रायगड- अनंत गिते
सिंधुदुर्ग, रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजन विचारे
मुंबई, ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई, दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई, वायव्य- अमोल कीर्तिकर
मुंबई, दक्षिण मध्य - अनिल देसाई
परभणी- संजय जाधव
मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंविरोधात एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्या यादीत कल्याण मतदारसंघाचा समावेश नसल्याने केदार दिघे नाराज असल्याचं बोललं जात आहे.