नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट

Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 25, 2024, 09:22 PM IST
नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट title=
Loksabha Election 2024 Nashik Hemant Godse interested candidates and four mlas meet Devendra Fadnavis

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीहून महायुतीत कलगीतुरा वाढताना दिसत आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपाने मुंबईत शक्तिप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवली आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे शेकडो समर्थकांसह ठाण्यात रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यांनी एकनाथ शिंदे निवासस्थानी जाऊन यांची भेट घेतली. तर दुसरीकडे 3 आमदारांसह इच्छुकांनी सोमवारी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. (Loksabha Election 2024 Nashik Hemant Godse interested candidates and four mlas meet Devendra Fadnavis)

या बैठकीत नाशिकच्या जागेसंदर्भात स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांनी नाशिकची जागा भापलाच मिळावी, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

नाशिकला भाजपची ताकद अधिक

सांगर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी आता काय झालं याबद्दल माध्यमांना सांगितलं.  त्या म्हणाल्या की, आजचा विचार केला तर आमचे तीन आमदार, 100 नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी त्यांनी आग्रही आहेत. आमच्या सर्वांची ही मनापासूनची इच्छा की नाशिकची जागा भाजपला मिळावी, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 

मनसेला जागा सुटणार?

मनसे महायुतीत सहभागी होण्याची चर्चा असल्याने नाशिक आणि शिर्डीची जागा त्यांच्याकडे जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्ये आणि इच्छुकांमध्ये नाशिकच्या जागेवरुन धुसफुस सुरु आहे. पत्रकारांनी या मनसेबद्दल प्रश्न विचारल्यावर फरांदे म्हणाल्या की, जर त्यांची ताकद अधिक असेल तर त्यांना उमेदवारी द्यावी. मात्र आज ताकदीच्या विचार केल्यास भाजप नाशिकमध्ये श्रेष्ठ आहे. 

नाशिक जागा नेमकी कोणाची?

मनसे नाशिकसाठी दावा करतील असा चर्चा असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनीदेखील नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला आहे. यावर देवयानी फरांदे  म्हणाल्यात की, ही जागा सगळेच मागतील, पण ज्यांची जास्त ताकत त्यांना ही जागा मिळावी. आम्ही आज महत्त्वाचे लोक आलो आहोत, मात्र आम्हालाही 5-10 हजार लोकांना घेऊन येता येतं. मात्र भारतीय जनता पक्षाची ती संस्कृती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

गोडसेंचं शक्तीप्रदर्शन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या लोकसभेचे हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, असं वक्तव्य केलं. त्यानंतर महायुतीत मिठाचा खडा पडला. एकंदरीत लोकसभेतील महत्त्वाचा मतदारसंघ असून महायुतीमधील धुसफूस वाढली असून याठिकाणी नेमकी कोणा विरुद्ध कोणाची लढत होणार, लवकर स्पष्ट होईल.