'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'

Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 26, 2024, 07:54 AM IST
'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..' title=
राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

Modi Shah Against Gadkari Claims Raut: "भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मिळून बहुमताच्या आसपास पोहोचत नाहीत व इंडिया आघाडीस तीनशेच्या जवळपास जागा मिळत आहेत," असं भाकित उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. "मोदींचे सरकार जात आहे. त्यामुळे परदेशी उद्योगपतींनी साधारण सवा लाख कोटींची गुंतवणूक मागे घेतली. नव्या सरकारबरोबर नवा करार करू असे या सगळ्यांचे म्हणणे आहे," असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत इतक्यावरच थांबले नाहीतर मोदी सरकारच्या काळात परदेशातील भारतीय गुंतवणूक वाढली असून हा सर्व काळा पैसा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राऊत यांनी नितीन गडकरींचा नागपूरमध्ये पराभव करण्यासाठी मोदी आणि शहांनी प्रयत्न केल्याचाही दावाही केला आहे.

दुबईत गुजराती व मारवाड्यांची संपत्ती वाढली

"मोदी यांच्या काळात नवी गुंतवणूक देशात आलीच नाही व देशाची संपत्ती घेऊन येथील धनिक बाहेर गेले. भारतातून सर्वाधिक संपत्ती दुबईत गेली. दुबईच्या रिअल इस्टेट उद्योगात सर्वाधिक गुंतवणूक भारतीयांनी केली आहे. 29,700 भारतीयांनी मोदी काळात दुबईत संपत्ती खरेदी केली. दुबईतील 35000 महत्त्वाच्या प्रॉपर्टी भारतीयांच्या मालकीच्या आहेत व यात गुजराती व मारवाडी सर्वाधिक आहेत या संपत्तीची अंदाजे किंमत 17 अब्ज डालर इतकी आहे. हा सर्व काळा पैसा आहे व मोदी काळात हे काळे धन दुबईत गेले. दुबईचे शेख राजे मोदींचे मित्र आहेत. त्यांच्या मदतीने मोदी या सगळ्यांचे काळे धन भारतात आणू शकले असते. कारण ते विश्वगुरू, विष्णूचे तेरावे अवतार असे बरेच काही आहेत, पण मोदी व त्यांच्या लोकांनी उघडपणे देशाची लूट होऊ दिली व पुन्हा देशभक्त असल्याचा बिल्ला छातीवर लावून हे फिरत राहिले. मोदी व शहा हेच देशातील काळ्या धनाचे मुख्य चौकीदार म्हणून वावरले. त्यांनी सर्व काळे धन भारतात परत आणण्याचे वचन दिले, ते खोटे ठरले," असं 'रोखठोक' या 'सामना'तील लेखामधून संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सर्व खेळ 4 जूननंतर बंद

"मोदी यांनी त्यांच्या मित्रांची संपत्ती वाढवली. त्याच संपत्तीवर राजकारण केले. गरीबांना धर्माच्या अफूची गोळी दिली. गुलामांना गुंगीत ठेवून स्वत: मौजा करीत राहिले. ते विरोधकांवर खोटे आरोप करीत राहिले, ओरडत राहिले. हे सर्व खेळ 4 जूननंतर बंद होतील," असं राऊत यांनी म्हटलं आहे..

‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’

"4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल," असा दावा राऊत यांनी केला आहे.

नक्की वाचा >> '4 जूननंतर मोदी-शहांना अज्ञातवासातच जावे लागेल', राऊतांचं भाकित; म्हणाले, 'ED, CBI..'

महाराष्ट्रात 32 जागांवर मोदी-शहा मित्रमंडळाचा पराभव

"महाराष्ट्राने मोदी-शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र या निवडणुकीत पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेलाही भ्रष्ट केले. त्याचे आज कुणालाच काही वाटेनासे झाले. मोदी-शहांच्या राजकारणाने महाराष्ट्राचे केलेले हे अध:पतन. तरीही महाराष्ट्र विकला जाणार नाही व किमान 32 जागांवर मोदी-शहा मित्रमंडळाचा पराभव होईल," असं राऊत म्हणाले आहेत.

बदल नक्की होतोय

"महाविकास आघाडीने झंझावात उभा केला. त्यामुळे मोदी-फडणवीस-शिंदे उडून गेले. अमित शहांची दखलही महाराष्ट्राने घेतली नाही. महाराष्ट्रात पैशांचे राज्य या लोकांनी निर्माण केले. तोच महाराष्ट्र दिल्लीतील पैशांचे राज्य उखडून फेकेल. बदल नक्की होतोय. मोदींच्या बोलण्यातला व अंगातला जोर ओसरलाय हे दिसत आहे. 2019 ची निवडणूक ‘पुलवामा’ हत्याकांडातील जवानांच्या बलिदानामुळे मोदींनी जिंकली. 2024 ची निवडणूक मोदी-शहा त्याच जवानांचे शाप-तळतळाट यामुळे हरत आहेत. जवानांचे आत्मे भटकतच होते. 4 जूनला त्यांना मोक्षप्राप्ती होईल," असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.