पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

 बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे. यंदा बीड लोकसभा मतदारसंघाची लढत चुरशीची ठरणार आहे. 

Updated: Apr 26, 2024, 06:57 PM IST
पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला? title=

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान सुरु आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडी आणि महायुती असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. यात यंदा बीड लोकसभा मतदारसंघाची लढत चुरशीची ठरणार आहे. 

बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे बीड मतदारसंघाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

बीड लोकसभा मतदारसंघ हा मुंडे भावंडांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सध्या त्यांची बहीण प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार आहेत. मुंडे बंधू-भगिणींच्या संघर्षामुळेही हा मतदारसंघ चर्चेत आहे.

काँग्रेसने केलंय नेतृत्व

बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे, असं म्हटलं जातं. कारण 2004 चा अपवाद वगळता गेल्या आठ निवडणुकांमध्ये या ठिकाणच्या मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. पण या मतदारसंघावर 1995 पर्यंत काँग्रेसची पकड होती. काँग्रेसच्या केसरबाई क्षीरसागर यांनी तीन वेळा लोकसभेत पोहोचल्या. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत पिपल्स डेमोक्रेटिक फ्रंट, 1967, 1977 मध्ये माकप आणि 1989 जनता दलाच्या उमेदवार विजयी झाले. 

भाजपचा बालेकिल्ला

यानंतर 1996 मध्ये भारतीय जनता पक्षाने ही जागा ताब्यात घेतली. रजनी पाटील यांना पक्षाने तिकीट दिले. त्या निवडणुकीत विजयी झाल्या. पण यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर 1998 मध्ये जयसिंगराव गायकवाड पाटील भाजपकडून निवडणूक जिंकले. 1999 मध्येही ते भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर जयसिंगराव पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 मध्ये निवडणूक लढवली. या ठिकाणाहून ते विजयी झाले. 

प्रीतम मुंडेंचा विक्रमी विजय

यानंतर 2009 मध्ये भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली. गोपीनाथ मुंडे हे 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत विजयी झाले. 2014 मध्ये ते मंत्रीही झाले. पण 3 जून 2014 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आणि भाजपने गोपीनाथ यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवत विक्रमी विजय मिळवला. 

मुंडे बंधू-भगिनी एकत्र

2019 मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. 2019 मध्ये 1 लाख 68 हजारांच्या फरकाने प्रीतम मुंडे विजयी झाल्या. यानंतर आता भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे अजित पवारांसोबत धनंजय मुंडेही भाजपसोबत आहेत. सध्या ते दोघे राजकीयदृष्ट्या एकत्र असल्याने ते पंकजा मुंडेंसाठी प्रचारही करताना दिसत आहेत. 

निर्णायक मुद्दे

  • बीडमध्ये रेल्वे कधी सुरु होणार? 
  • शेतकऱ्यांचे हमीभाव, सोयाबीनचे दर 
  • ऊसतोड मजुरांचा मुद्दाही चर्चेत
  • पाणी आणि वॉटरग्रीडचा मुद्दा प्रलंबित 
  • मराठा विरुद्ध कुणबी मुद्दाही चर्चेत

मतदारांची संख्या

बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 21 हजार 102 मतदार आहेत. यात 8 लाख 61 हजार 696 पुरुष आणि 7 लाख 59 हजार 399 महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत 13 लाख 52 हजार 399 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.