सोमय्यांच्या उमेदवारी बाबत उद्या उद्धव ठाकरे आणि अमित शाहंमध्ये चर्चा ?

 शिवसेनेने किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आहे. 

Updated: Mar 29, 2019, 02:58 PM IST
सोमय्यांच्या उमेदवारी बाबत उद्या उद्धव ठाकरे आणि अमित शाहंमध्ये चर्चा ? title=

मुंबई : भाजपाने आपली बारावी मतदार यादी आज जाहीर झाली. पहिल्या यादी पासून आतापर्यंत ईशान्य मुंबईच्या जागेकडे शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे. पण यासाठी आणखी काही काळ यांना वाट पाहावी लागणार आहे. कारण या यादीतही ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. आपल्या वक्तव्यांनी स्वत:वर रोष ओढवून घेतलेल्या भाजपा खासदार किरिट सोमय्या या जागेसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी यासाठी मातोश्रीचे दरवाजे ठोठावण्याचाही प्रयत्न केला. पण मातोश्रीतून त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही.  ईशान्य मुंबईतल्या उमेदवारीबाबत उद्या उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

किरीट की स्पिरिट, सोमय्यांवर 'मातोश्री'च्या दारावर जाण्याची वेळ

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. किरीट सोमय्या या मतदारसंघाच विद्यमान खासदार आहेत. मात्र, मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्यात शेलक्या शब्दांत टीका केल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या नावाला जोरदार विरोध दर्शवला होता. सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेची मते राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडे वळू शकतात. त्यामुळे भाजपकडून अजूनही ईशान्य मुंबईतील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई पालिकेतील नेते मनोज कोटक आणि प्रवीण छेडा यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. 

भाजपा अध्यक्ष अमित शाह उद्या गांधीनगरमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन होणार असून एनडीएतले महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील इथे हजेरी लावतील. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवर याठिकाणी निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे. शिवसेनेने किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आहे. सोमय्या यांच्या ऐवजी मनोज कोटक यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो असे सेनेच्या गोटातून सुचवलेही जात आहे. भाजपनंही अद्याप इथून उमेदवार जाहीर केलेला नाही
 
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना तर 'माफिया' संबोधत, मुंबईतील बिले काढण्यासाठी टक्केवारी दिल्याशिवाय ठेकेदारांना बिले मिळत नाहीत, असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला होता. तसंच 'छगन भुजबळांनी ज्या कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केलं त्याच कंपन्यांमधून उद्धव ठाकरेंनीही मनी लाँडरिंग केलं होतं' असा आरोपही सोमय्या यांनी शिवसेना पक्षाप्रमुखांवर केला होता. भाजपाकडून ठोस आग्रह होत नसल्यानं शिवसेनेच्या सोमय्या विरोधाला आणखी धार आलीय. किरीट सोमय्यांना उमेदवारी जाहीर झाल्यास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.