दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणूकीला काही दिवसच उरले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उमेदवारांची पळवापळवी सुरू असताना दुसरीकडे त्याच पक्षात निष्ठावंतांना डावलल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी नाराज असल्याचे समोर येत आहे. पक्षांत महिला नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. सर्वच पक्ष हे पुरुष प्रधान संस्कृतीचे असून पुरुष नेत्यांना महिलांकडून असुरक्षिततेची भावना वाटत असल्याचे शायना एनसी यांचे म्हणणे आहे.
निवडणुकीच्या तोंडावर खुद्द भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनीच असे विधान केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे. यावेळी त्यांना 'मै भी चौकीदार' कॅम्पेन बद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनला जवळजवळ सर्वच केंद्रीय तसेच राज्यांतील नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर शायना यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. नावापुढे चौकीदार लावायला मी सांसद नाही असे म्हणत त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
महिलांच्या राजकारणातील प्रवेश आणि अस्तित्वाबद्दल शायना आक्रमक झाल्या आहेत. आता वेळ महिलांसाठी लढायची असल्याचे त्या म्हणाल्या. मी बंड करणार नाही पण संघर्ष करायची वेळ आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने महिलांना तिकीट दिले पाहीजे. बीजेपी असो वा काँग्रेस,एनसीपी,शिवसेना या सर्वच पक्षांनी महिलांना समान संधी द्यायला हवी असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी, नविन पटनायक यांनी महिला उमेदवारांना प्रधान्य दिले आहे. राजकीय पक्षात पुरुष प्रधान संस्कृती कायम असल्याचा आरोप त्यांनी केला असून पुरुषांना महिलांपासून असुरक्षितता वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.