Gudi Padwa 2019 : यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने द्या 'या' नव्या लूकला पसंती

उन्हाचा दाह लक्षात घेत जपा सणाचा उत्साह 

Updated: Apr 1, 2019, 02:05 PM IST
Gudi Padwa 2019 : यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने द्या 'या' नव्या लूकला पसंती title=

मुंबई : Gudi Padwa 2019 सणवार म्हटलं की त्या निमित्ताने होणारी खरेदी आली आणि खरेदी आली की ओघाओघाने त्यात एखाद्या नव्या कपड्यासाठी आपल्या खणात जागा ही केलीच जाते. सध्या अशाच एका सणाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने प्रत्येक जण व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत खरेदीला प्राधान्य देत आहेत. या खरेदीसोबतच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि शोभायात्रेत जाण्यासाठी यंदा काय नवं करायचं हा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करत असेल. तर मग, सध्याचे एकंदर ट्रेंड पाहता याच लूकमध्ये गोळाबेरीज करत चला पाहूया काही नवे आणि हटके लूक्स आणि नवे ट्रेंड.... 

फ्लोरल फेटा- फेटा म्हणजे शान.... असं प्रत्येकाचच म्हणणं आहे. ती व्यक्ती महाराष्ट्रातील असो किंवा इतर कोणत्या ठिकाणची. प्रत्येक प्रांतात त्यांच्या परिने फेटा बांधला जातो. अशा या फेट्याला तरुणाईतसुद्धा चांगलाच मान आहे. सणाच्या दिवशी तर फेटा बांधून घेत रुबाबात वावरणाऱ्याची संख्याही हल्ली वाढली आहे. फेटा बंधताना त्याचे रंग आणि कापडही तितकच महत्त्वाचं. गेल्या काही वर्षांपासून साडीचा फेटा बांधत त्याची ऐट पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी याच फेट्याला काहीसा मॉडर्न टच देत आणि त्याची पारंपरिकता जपत फ्लोरल प्रिंट असलेल्या कापडाचा फेटा बांधून पाहा. सुंदर आणि उठावदार रंगांमध्ये मोठमोठ्या फुलांच्या प्रिंट असणारा फेटा हा गर्दीत वेगळा दिसेलच पण, त्यासोबतच तुमच्या लूकला परिपूर्णही करेल.

एसिमेट्रिक कुर्ता- पारंपरिक झब्बा त्यातही पिवळा, केशरी, पांढरा, आकाशी अशाच रंगांना पाडव्याच्या निमित्ताने उधाण आल्याचं पाहायला मिळतं. त्याला जोड असते ती म्हणजे बंडी किंवा सध्याच्या ट्रेंडनुसार म्हणावं तर मोदी जॅकेटची. पण, तोच तोच ट्रेंड फॉलो करुन कंटाळलेल्या तरुणांसाठी एक चांगला पर्याय सध्या उबलब्ध आहे. तो पर्याय म्हणजे एसिमेट्रिक कुर्ता. दोन भिन्न टोकं आणि तितकाच लक्षवेधी आकार ही या कुर्त्याची वैशिष्ठ्य. बरं घातल्यानंतर त्यामुळे दिसणारा लूक हासुद्धा तितकाच सुरेख. त्यामुळे साचेबद्द झब्बा घालण्याऐवजी काही नव्या पर्यायाच्या शोधात असाल तर एसिमेट्रिक कुर्ता योग्य ठरु शकतो. 

वजनाने हलक्या असणाऱ्या साड्या- सध्या सुरु असणारा उन्हाचा तडाखा पाहता सणाच्या निमित्ताने, 'साडी.... नको रे बाबा' असं म्हणणाराही महिलांचा एक वर्ग आहे. पण, आता यावरही सुरेख असे पर्याय उपलब्ध आहेत. ड्रेस आणि हेवी कुर्तीतच सण साजरा करण्यापेक्षा तुम्हीही साडीत अगदी छान दिसू शकता. विविध प्रराकारच्या, जास्तीचं भरजरी काम नसणाऱ्या पण, तरीही सणाच्या दृष्टीने साजेसा अशा अनेक साड्यांचे पर्याय आणि तितकेच बहुविध रंग सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये हलकं जरीकाम, सुरेख अशा प्रिंट असणाऱ्या साड्यांचे असंख्य पर्याय आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याला साडीच..... असं म्हणायला हरकत नाही. 

ऑक्सिडाईज़्ड अलंकार- सणावाराला सोन्याचे, मोत्यांचे किंवा फारफार हिऱ्यांचे दागिनेही घालणाऱ्यांची संख्या अमाप आहे. पण, अनेकदा मुलींच्या/ महिलांच्या दृष्टीकोनातून पाहायला गेलं तर एखाद्या साडीवर सोन्याचे दागिने शोभतातच असं नाही. अशा वेळी पर्याय काय? गुढीपाडव्याच्या निमित्ताने रॉ तितकाच उठावदार लूक हवा असल्याच ऑक्सिजाईज्य अलंकारांचा वापर करणं हा उत्तम पर्याय ठरु शकतो. अर्थात हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे. पण, ऑक्सिडाईज्ड नथनी, कर्णफुलं, गळाहार, बांगड्या, अंगठ्या यांचा ट्रेंड पाहता या नव्या लूकला पसंती द्यायला काहीच हरकत नाही. पुरुषांसाठीही ऑक्सिडाईज्ड अलंकारांमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहेत. 

हेअरस्ट्राईल/ केशभूषा-  गुढी पाडव्याच्या शोभायात्रा या सकाळी लवकर सुरू होतात. अगदी सूर्यदेवतेच्या आगमनाने या मिरवणुकांची सुरुवात होते ती थेट दुपारपर्यंत ही धूम पाहायला मिळते. अशा वेळी महिला वर्गात आपल्या साडी किंवा ड्रेसला साजेशी अशी नेमकी कोणती हेअरस्टाईल करायची आणि ती कशी करायची हा महत्त्वाचा प्रश्न असतो. फेटा बांधणार असाल तर, केस मोकळे ठेवणं किंवा वेणी (खजूरवेणी, सागरवेणी) घालणं हे काही पर्याय आहेत. मुख्यम्हणजे असे केस बांधल्याच मानेवर हेअरस्टाईलचं ओझं होणार नाही आणि फेटा अधिक काळ बांधल्यामुळे अनेकांनाच होणारा डोकेदुखीचा त्रासही उदभवणार नाही. केशभूषेसाठी आणखी एक पर्याय म्हणजे मेसी बन. विखुरलेल्या केसांची सुरेख रचना करत एक सोपा असा आंबाडा बांधत त्याच्या एका बाजूला गुलाबाचं फुल किंवा एखादा गजरा माळला तर हा लूक अतिशय सुरेख दिसतो आणि तो साकारण्यासाठी फारसा वेळही दवडला जात नाही. 

मेकअप- सुंदर मी होणार.... हे जे काही वाक्य आहे, त्याच वाक्याचा प्रत्यय अशा सणावारांना पाहायला मिळतो. पण, अशा वेळी तयार होताना सध्याच्या ऋतूचक्राचाही अंदाज घेणं तितकच महत्त्वाचं आहे. उन्हाच्या झळा लागल्यानंतर ओघळणाऱ्या घामाने मेकअपही पसरतो. त्यामुळे सोबत टिश्यू पेपर किंवा सुती रुमाल ठेवा. जास्त मेकअप करणं टाळा. किंवा केलातच तर त्यात गडद छटांचा वापर टाळा. आयशॅडो आणि लिपस्टीकही हलक्या रंगांच्या लावत त्याला चांगली फिनिशिंग द्या. डोळ्यांसाठी वापर करतच असाल तर, कोटेड आयलायनरऐवजी मॅट आयलायनरचा वापर करा. नैसर्गिक सौंदर्याला उठावदार करण्याता प्रयत्न करा. कुंकवाची चंद्रकोर कपाळावर कोरण्यापूर्वी टीकली स्वरुपातील चंद्रकोर मिळाली तर उत्तम. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंलंही कपाळावर चंद्रकोर काढतात, पण अशा वेळी घाम येऊ लागल्याल कुंकवाचे ओघळ कपाळावर पसरतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी टीकली हा एक चांगला पर्याय आहे.