सांगली : सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाणार नाही. आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आमचा काँग्रेस पक्ष सर्व सामान्यांचा पक्ष आहे. इतरांच्या सारखा पुढाऱ्यांच्या टोळीचा पक्ष नाही. असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी म्हटलं आहे. सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यास विरोध सुरु आहे. सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षातून काही नेते बाहेर जातील अशी फक्त चर्चा होती. मला पण चिंता होत होती. पण तस काही होणार नाही, कोणी पण पक्ष सोडणार नाही. परिस्थिती न समजून घेता, काँग्रेस कमिटीला, कुलूप लावणे अज्ञानपणा आहे. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना एकत्र बसवून समजूत काढू असं देखील मोहनराव कदम यांनी म्हटलं आहे.
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण आता याच मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळत नाही. गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेसची येथे सत्ता आहे. ३५ वर्षं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं या मतदारसंघावर वर्चस्व होतं. २०१४ मध्ये मात्र येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता. भाजपचे संजय पाटील येथून निवडून आले होते.
काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेसकडे वर्धा, बुलडाणा आणि सांगली या ३ जागा मागितल्या आहेत. बुलडाणा आणि वर्ध्यात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सांगलीची जागा देखील राजू शेट्टींनी मिळते का हे पाहावं लागेल.