LokSabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्योारोप करत आहेत. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाकयुद्ध सुरु आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असून, यादरम्यान कुटुंबीयांचाही उल्लेख होत आहे. यावेळी शरद पवार यांनी एका सभेत महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख बाहेरची सून असा केला होता. त्यांच्या या टीकेमुळे अजित पवार व्यथित झाले आहेत. झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत अजित पवार यावर बोलताना भावूक झाले. दरम्यान या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.
शरद पवारांनी केलेल्या 'बाहेरची सून' टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच व्यथित झाल्याचं पाहायला मिळालं. "तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणता. तुम्ही महिलांबद्दल बरंच काही बोलत म्हणता. तुमच्या घरात 40 वर्षं सून आहे, तिला तुम्ही बाहेरची समजता. यावरुन लोकांनी काय समजायचं ते समजून घेतलं आहे. हा सर्व सुनांचा अपमान आहे. आणि जेव्हा ते बाहेरची म्हणत होते तेव्हा आजुबाजूला बसलेले सगळे हसत होते. ते सगळे खिदळत होते. त्यांनाही कोणाला आपल्या घरी सून असेल किंवा येणार असेल याचंही तारतम्य नव्हतं," अशी टीका अजित पवारांनी केली.
To The Point | Ajit Pawar | बाहेरची सून टीकेवरून अजित पवार 'झी २४ तास'च्या मुलाखतीत झाले भावुक
पाहा 'टू द पॉईंट' शनिवारी रात्री 9 आणि 11 वाजता आणि रविवारी दुपारी १२ वाजता फक्त Zee 24 तासवर @kamleshsutar @AjitPawarSpeaks #AjitPawar #NCP #Zee24Taas pic.twitter.com/BfbpNTroRs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 27, 2024
सख्खे भाऊ श्रीनिवास पवार विरोधात का गेले? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केला. "बारामतीचा उमेदवार बदलण्याची मागणी भावानं केली होती. उमेदवार बदल, सोबत राहिन असं त्यांनी सांगितलं होतं. याचा अर्थ मला कळला नसल्याने मी विचारलं, पण त्याने जास्त काही सांगण्यास नकार दिला. पण राजकारणात असताना कोणाला तिकीट द्यावं याचा निर्णय आम्ही घेऊ," असं अजित पवार म्हणाले.
कोणत्या कळपात आहोत यावरुन कोण आहे हे ठरतं का? म्हणजे तेव्हा अजितदादा चांगला माणूस, आणि जरा तिकडे गेला की लगेच भ्रष्टाचारी माणूस. कोणी म्हणायचं 10 हजार, 25 हजार, 70 हजार कोटींचा घोटाळा केला. आम्हीदेखील माणूस आहोत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आम्हाला देखील वेदना होतात. कितीवेळा चौकशांना सामोरं जायचं? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी केला.
आम्ही चौकशीला सामोरं जाताना टीव्हीसमोर येऊन नोटीस आली सांगत नौटंकी केली नाही. लोकांना आपलंस करण्याचा, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही मीडियाला आता ईडीला जातोय असं सांगत नौटंकी केली नाही अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांचं नाव न घेता हल्ला चढवला. मीडियातील चर्चेमुळं मोदींनी आरोप केले. मात्र ते सिद्ध झाले नाहीत, याकडंही अजित पवारांनी लक्ष वेधलं.