LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवार जाहीर असताना सर्वांचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे होतं. याचं कारण या मतदारसंघात सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार हे स्पष्ट होतं. असं असताना महायुती त्यांच्यासमोर कोणाला उभं करणार याची उत्सुकता होती. त्यातच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून अजित पवार गटाने अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
अजित पवार गटाने दुपारी पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देत असल्याचं जाहीर केलं होतं. यावेळी बारामतीचा उमेदवार त्यांनी जाहीर केला नव्हता. यादरम्यान जयंत पाटील यांनी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर करताना सुप्रिया सुळे बारामतीमधून लढतील असं स्पष्ट केलं होतं. यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद बोलावत सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
शरद पवार गट आणि अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या निमित्ताने नणंद आणि भावजय निवडणुकीच्या रिंगणात एकमेकींना टक्कर देणार आहेत.
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना आजचा दिवस आयुष्यातील सर्वात भाग्याचा असल्याचं म्हटलं. तसंच संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. शिवजयंतीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याला भेट दिली आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यानतंर दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर होणं सुवर्णक्षण असून, सन्मानच आहे असं त्या म्हणाल्या आहेत. जाईन तिथे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तो पाहून ते दादांच्या पाठीशी उभी राहतील असं दिसत आहे असंही त्या म्हणाल्या. माझी उमेदवारी जनतेने ठरवली आहे. ही निवडणूक जनतेच्या हातात आहे असंही त्यांनी सांगितलं.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 5 उमेदवारांचा समावेश करण्यात आला. अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत स्वगृही परतलेल्या निलेश लंके यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आमदारकीची राजीनामा देत शड्डू ठोकला होता. तसंच पेक्षेप्रमाणे बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वर्धा येथून अमर काळे, दिंडोरीमधून भास्कर भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.