Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जळगावात मोठा धक्का बसण्याची शक्यताय. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटलांनी (Unmesh Patil) संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतलीय. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena UBT) वाटेवर असल्याची चर्चा आहे. भाजपनं तिकीट कापल्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळेच उन्मेष पाटील ठाकरेंच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. यावेळी त्यांच्यासोबत करण पवारही उपस्थित होते. ते जळगावात मविआचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुरक्षित नसल्याचा दावा भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांनी केलाय. मात्र, उन्मेष पाटलांबाबत उद्याच कळेल असं विधान संजय राऊत यांनी केलंय.
उन्मेष पाटील शिवसेनेत
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक पार पडली.
जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उन्मेष पाटील यांनी चांगलं काम केलं आहे. अनेक वर्ष ते भाजपाचं काम करत आहेत, अनेक चळवळींशी ते जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिमा चांगली आहे, असं असताना देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. उन्मेष पाटील यांच्याबरोबर जळगाव जिल्ह्यातील त्यांचे शेकडो सहकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कोण आहेत उन्मेश पाटील
उन्मेष पाटील हे उच्चशिक्षित आहेत. 1994 मध्ये पाटील यांनी प्रवरानगरमधून पॉलिटेक्निक पूर्ण केलं. त्यानंतर 1997 मध्ये जळगावमधून केमिकल इंजिनिअरिंगचं (B.E.) शिक्षण घेतलं. हिशोब आणि मोजणीसाठी उन्मेष पाटील यांनी 'ई मुनिमजी' हे सॉफ्टवेअर तयार केलं होतं.
राजकारणातलं पहिलं पाऊल
उन्मेष पाटील यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं ते आंदोलनाच्या माध्यमातून. चाळीसगाव तालुक्यातील बंद पडलेला बेलगंगा साखर कारखाना सुरु करण्यासाठी त्यांनी शेतकरी आणि स्थानिक तरुणांना घेऊन जिल्हा बँकेवर मोर्चा काढला. या आंदोलनामुळे ते प्रकाशझोतात आले. त्यांनी भाजप प्रवेश केला आणि अगदी कमी वयात त्यांनी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मिळाल्या. 2014 मध्ये उन्मेष पाटील भाजपाच्या तिकिटावर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीला उभे राहिले आणि 22 हजारांच्या मताधिक्क्याने विजयीदेखील झाले.
2019 मध्ये उन्मेष राटली यांनी संपूरण ताकद पणाला लावत जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा विजय मिळवून दिला. पण यावेळी त्यांनी तिकिट नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज झालेले उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत.