Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात म्हणावं तसं यश मिळालं नाही. महाविकास आघाडीने 31 जिंकत मोठी मुसंडी मारली. तर महायुतीमधील भाजपाला 9 जागांवर सामाधान मानावं लागलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या. तर अजित पवार गटाच्या वाट्याला एकच जागा आली. असं असतानाच आता महायुतीमधील मित्र पक्षांमध्येच जिंकलेल्या लोकसभेच्या जागांच्या आधारे विधानसभेसाठी दावेदारी केली जात आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये भाजपा विरुद्ध महायुतीतील इतर दोन पक्ष असा संघर्ष विधानसभेच्या जागा वाटपावरुन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्राथमिक ठिणगी भाजपा आणि शिंदे गटात पडलीय. नेमकं काय घडलं आहे पाहूयात...
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला आहे. नारायण राणेंच्या विजयानंतर भाजपाने जोरदार जल्लोष केला. निलेश राणे आणि नितेश राणे दोघेही आपल्या वडिलांबरोबर या जल्लोषामध्ये सहभागी झाले होते. सोशल मीडियावरुन त्यांनी या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. विशेष म्हणजे या विजयामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीवरही परिणाम होणार असल्याचं नितेश राणेंनी केलेल्या मागणीवरुन दिसत आहे. निलेश राणेंनीही एक पाऊल पुढे जात नवीन मागणी केली असून यावरुन आता शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.
नारायण राणेंच्या विजयानंतर नितेश राणेंनी उदय सामंत यांच्या रत्नागिरी तसेच राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र या मागणीनंतर निलेश राणेंनी थेट रत्नागिरी मतदारसंघावरही दावा सांगितला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांनी अशी एक पोस्ट केली आहे. "नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार," असं थेट विधान निलेश राणेंनी केलं आहे.
मात्र निलेश राणेंच्या या विधानावरुन आता कोकणात भाजपा विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष होण्याची चिन्हं दिसत आहेत. राणे पुत्रांनी केलेल्या विधानासंदर्भात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी निलेश आणि नितेश राणेंवर टीका केली आहे. "नितेश राणे आणि निलेश राणे यांना काहीतरी बोलल्या शिवाय करमत नाही. निकाल लागला नाही तोवर त्यांनी दावा करणे चुकीचं आहे," असं गोगावले म्हणालेत. "भाजपमध्ये अनेक ठिकाणी उलटसुलट घडामोडी झाल्यात त्या आम्ही सांगायच्या का? तिथं आम्ही दावे करायचे का? असा उलट सवाल शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलाय.
"दोघा राणे बंधूंच्या दाव्यांना वरती कुणी विचारणार नाही. नाहीतर विधान परीषदेच्या पदवीधर जागेचा आम्हालाही विचार करावा करावा लागेल. एकतर त्यांना तिकीट मिळताना अडचण झाली होती. मुख्यमंत्र्यांनी किरण सामंतांची समजूत काढली म्हणून त्यांना एवढी मते मिळाली. राणे बंधूनी संभाळून बोलावे," असा सूचक इशारा गोगावले यांनी दिला आहे.