मोदींसाठी काय 'पण'! चाहत्याने १२ वर्ष चप्पलच घातली नाही

नांदेडमध्ये राहणाऱ्या दीपक ठाकूर यांची ओळख मोदींचे चाहते अशीच आहे.

Updated: Apr 14, 2019, 07:36 PM IST
मोदींसाठी काय 'पण'! चाहत्याने १२ वर्ष चप्पलच घातली नाही title=

सतिष मोहिते, झी २४ तास, नांदेड : नांदेडमध्ये राहणाऱ्या दीपक ठाकूर यांची ओळख मोदींचे चाहते अशीच आहे. त्यांचं चहाचं दुकान आहे, त्या दुकानामध्येही 'मोदी कडक चहा' नावाचा स्पेशल चाहा मिळतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची कार्यशैली पाहून दीपक ठाकूर भारावून गेले. मोदी जोपर्यंत पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत पायात चपला घालणार नाही असा संकल्प त्यांनी २००७ साली केला.

२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले, पण जोपर्यंत मोदींची भेट होत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचं ठाकूर यांनी ठरवलं. मोदींच्या भेटीसाठी ते तीन वेळा दिल्लीला गेले, पण भेट काही झाली नाही. या चाहत्याच्या या वेडाबद्दल पंतप्रधान मोदींना समजलं. नगरमधल्या सभेवेळी मोदींनी दीपक ठाकूर यांना बोलावून घेतलं, त्यांची भेट घेतली आणि असा वेडेपणा करू नका, असं सांगितलं.

गेली बारा वर्षं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये दीपक ठाकूर अनवाणीच फिरतात. जोपर्यंत २०१९ मध्ये मोदी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा नवा पण दीपक ठाकूर यांनी केला आहे.