मुंबई : दुस-या लाटेनंतर आता राज्यावर डेल्टा प्लसचं संकट घोंगावू लागलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं सरकारी स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटनं सर्वानाच धडकी भरवली आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटनं सर्वानाच धडकी भरवलीय. डेल्टा प्लसच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. अशातच अनलॉकमुळे गर्दी वाढू लागल्यानं संसर्गाचा धोकाही वाढलाय. पुन्हा रुग्ण संख्या दहा हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा लॉकाडाऊनची वेळ आलीय. निर्बंध कडक करण्यासंदर्भात सरकारी स्तरावर हालचालीही सुरू झाल्या आहेत.
तिस-या लाटेच्या धर्तीवर निर्बंधांबाबत लागू असलेले निकष अधिक कठोर करण्यात येतील. गर्दी टाळण्यासाठी कडक नियमावली करण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
डेल्टा व्हायरसची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्याची आरोग्य यंत्रणाही तयारीला लागलीय. ऑक्सिजन बेड वाढवण्यासोबत डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी वेगळा विभाग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी गाफील राहू नका...कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट अत्यंत घातक आहे. आतापर्यंत आपण बराच संयम पाळलाय आता ही लढाई अखेरच्या टप्प्यात आलीय असं समजून प्रत्येकानं नियमांचं पालन करायला हवं. तरच आपण डेल्टा प्लस आणि तिस-या लाटेवरही मात करू शकू.