मुंबई : राज्यात अघोषित भारनियमन सुरू झालंय. 3000 मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन लागू करण्याचा महावितरणनं घेतलाय. तीन गटांत 3 ते 4 तासांचं भारनियमन लागू झालंय.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही बसलाय. आज औरंगाबादमध्ये कार्यक्रम असल्याने हे नेते सोमवारी औरंगाबादमध्ये दाखल झाले आणि शासकीय विश्राम गृहात मुक्कामाला गेले. मात्र, रात्री त्या ठिकाणची वीज गेली आणि निम्मी रात्र या नेते मंडळींना अंधारात काढावी लागली.
वाढलेल्या गरमीचा त्यांना चांगलाच त्रास झाला. अखेर रात्री खूप उशिरा वीज आल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.
औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक या परिसरात लोडशेडिंग होणार आहे. ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ झालीय.
सोमवारी औरंगाबाद शहरातील अनेक भागात वीज रात्री उशिरा पर्यंत नव्हती. काही ठिकाणी तर तब्बल आठ तास वीज गायब होती. कोळशाच्या कमतरतेमुळे अघोषित लोड शेडिंग सुरू झालीय आणि त्याचा फटका आता सर्वसामान्य सहित नेतेमंडळींनाही बसू लागलाय.