Maharashtra Breaking News LIVE: आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? कोणत्या Updates वर राहणार लक्ष? पाहा सर्व अपडेट एका क्लिकवर...
10 Sep 2024, 19:36 वाजता
ईद-ए-मिलादच्या वेळी डीजे, बीम लाइट्सच्या वापरावर बंदीची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली
ईद-ए-मिलादच्यावेळी डीजे, बीम लाइट्सच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नाकारली आहे. पुणे शहरातील चार रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डीजे आणि बीम लाइटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी आणि ईद-ए-मिलादच्या वेळी मुस्लिम तरुण डीजेच्या तालावर नाचू शकत नाहीत, कारण यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा दावा केला होता. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद साजरी होणार असून या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांचे यावेळी डीजे, बीम लाइट्सच्या वापरावर बंदीची मागणी केली होती. मात्र मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
10 Sep 2024, 18:08 वाजता
किरीट सोमैयांनी नाकारलं भाजप प्रचार समिती सदस्यपद
भाजपाचे माजी खासदार किरीट सौमैया यांची भाजप प्रचार समितीचे सदस्य म्हणून नेमणूक केली होती. मात्र भाजप प्रचार समिती सदस्यपद सोमैयांनी नाकारलं आहे. किरीट सोमैया यांनी ट्विट करून लिहिले की, "मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल मी भाजप महाराष्ट्राचे आभार मानले आणि खेद व्यक्त केला आणि ते करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. मी महाराष्ट्र भाजप अध्यक्षांना लिहिले आहे की, गेली 5 आणि 1/2 वर्षे (18/2/2019 पासून) मी भाजपचे काम सामान्य सदस्य म्हणून करत आहे आणि सामान्य सदस्याप्रमाणेच करत राहीन आणि प्रचार समितीमध्ये सामील होणार नाही".
10 Sep 2024, 16:30 वाजता
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं घेतलं दर्शन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यातील मानाच्या गणपतीसह अनेक प्रमुख मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती पासून त्यांची ही दर्शन यात्रा सुरू केली. त्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा गणपती, भोलेनाथ मित्र मंडळचा गणपती तसेच छत्रपती राजाराम मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अजित पवार जाणार आहेत.
10 Sep 2024, 15:20 वाजता
'मिळेल तिथे भूखंड खा आणि तृप्त व्हा..' विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची संजय राठोडांवर टीका
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय राठोड यांच्यावर टीका करून बेलापूरमध्ये दीड एकरचा भूखंड लाटल्याचा आरोप केला आहे. वडेट्टीवार यांनी म्हंटले की, गोर बंजारा समाजाला हा भूखंड दिला जाणार होता. परंतु मुख्यमंत्र्यानी सर्व कायदे बाजूला सारून या भूखंडाचे वाटप केले. कॅबिनेटचा निर्णय बदलुन मुख्यमंत्र्यानी नियमबाह्यपणे राठोड यांच्या कुटुंबियांच्या संस्थेला दिला आहे. यामुळे सरकारने बंजारा समाजाची घोर फसवणूक केली असून समाजाच्या नावाखाली संजय राठोड यांनी 500 कोटींचा भूखंड हडपला आहे.
10 Sep 2024, 13:57 वाजता
Breaking News : नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग
नाशिकच्या शिंदे गावात फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. श्री स्वामी समर्थ नावाच्या फटाका गोडाऊनमध्ये ही आग लागली असून फटाक्यांच्या स्फोटाच्या आवाजाने शिंदे गाव हादरले. या भीषण अग्नितांडवामुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
10 Sep 2024, 13:32 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी चेतन पाटील याला दिलासा मिळाला असून, त्याची न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली आहे. तर, मूर्तीकार जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
10 Sep 2024, 12:26 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मैत्रीपूर्ण लढती होऊ नयेत हे माझे वैयक्तिक मत- अजित पवार
अमित शहा आणि माझी भेट झाली असं सांगताना या भेटीत जागा वाटपाविषयी चर्चा झाली नाही असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही असंही ते म्हणाले. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर शेजारचा म्हणेल माझ्याकडे का नाही? त्यामुळे मैत्रीपूर्ण लढते होऊ नयेत हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र अजून तरी तशी काहीच चर्चा झाली नाही. महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली की अंतिम निर्णय ते घेतील. माझं मत मी तुम्हाला सांगितलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
10 Sep 2024, 11:31 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर
शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर. आजची सुनावणी आठवडाभराने पुढे ढकलली असल्यामुळं आता पुढील बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहिल्या क्रमांकाच्या केसवरच दिवसभर सुनावणी होणार आहे.
10 Sep 2024, 10:50 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, उपलब्ध माहितीनुसार सध्या इथं 18 दरवाजातून 10 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून, नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
10 Sep 2024, 10:39 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: जय आणि माझ्यात फरक काय? अजित पवारांनी मलाही आशीर्वाद द्यावेत- युगेंद्र पवार
शरद चंद्र पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार यांची आजपासून बारामती तालुक्यात स्वाभिमानी यात्रेला सुरुवात झालीय. श्रीक्षेत्र कनेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेची सुरुवात केली आहे. गावा गावात जाऊन गाव भेट दौरा करत नागरिकांच्या समस्या सोडून शरद पवार यांचे विचार देखील पोचवणार असल्याचे त्यांनी सांगितलेय. आमच्या गटाचे देखील अजून उमेदवारीचे फिक्स नसून जर माझे चुलत भाऊ जय पवार यांना त्यांनी उमेदवारी दिलीच तर माझी इच्छा आहे की मलाही काका म्हणून अजित पवारांनी आशीर्वाद द्यावेत माझ्यात आणि जय मध्ये फरक काय असेही ते म्हणालेत. विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची भावना आहे मात्र हा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार आहेत असेही ते म्हणाले.