पाण्यासाठी जीव धोक्यात, ग्रामीण भागातील भीषण वास्तव

पाण्यासाठी गावातील चिमुकल्यांचे जीव धोक्यात

Updated: May 11, 2019, 02:24 PM IST
पाण्यासाठी जीव धोक्यात, ग्रामीण भागातील भीषण वास्तव  title=

मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने ग्रामीण भागातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे. परिसरातील विहिरी, तलाव आटले असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. परिसरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी शेगाव तालुक्यातील चिंचोली, टाकळी वीरो आणि लासुरा या गावांतील रहिवाशांची वणवण सुरू आहे. या परिसरात असलेल्या आजूबाजूच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा पोहचू लागल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आता कायमस्वरूपी नळयोजनेची मागणी केली आहे. 

चिंचोली गावामधील जर चित्र बघितले तर दगडालाही पाझर फुटेल अशी स्थिती आहे. गावात टँकर येण्यापूर्वी लहान मुले नळ्या आणि पाईप घेऊन गावाच्या वेशीजवळ बसलेली असतात.

शेगाव तालुक्यात असणारं ५ हजार लोकसंख्येच चिंचोली गाव खामगाव शेगाव राज्य मार्गापासून २ किलोमीटर आत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने  पाण्याचे बहुतांश स्त्रोत आटले असून आता गावकऱ्यांना फक्त आणि फक्त प्रशासनाने सुरु केलेल्या टँकरवरच अवलंबून राहावे लागते आहे. गावामध्ये टँकर यायच्या अगोदर पाणी मिळावं याकरिता लहान लहान मुल पाईप आणि नळी घेऊन रस्त्याच्या कडेला वाट बघत उभे असतात.

गावात टँकर आल्यानंतर तर परिस्थती एवढी भयंकर असते की टँकरमागे पळतांना केव्हाही अपघात होऊ शकतो. परंतु त्याचा विचार केला तर पाणी मिळेल कसे.? त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून ही मंडळी या टँकर मागे पळत सुटतात ते फक्त पाण्यासाठीच. बुलढाणा जिल्ह्यात 199 गावांना 206 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही गावांमध्ये अनेक वर्षांपासून फक्त टँकरच हा एकमेव पर्याय असल्याकारणाने त्यांची पाण्यासाठीची वणवण कायमस्वरूपी आहे.

टँकरमधून पाणी भरण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे गावकरी आता शहरांकडे वळत आहेत रोजगार नाही कामधंदा नाही मुळात पाणीच नाही. त्यामुळे त्यांनी शहराकडे वळण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुळात शेगाव खामगाव जळगाव जामोद हा खारपाणपट्टा असून ही बाब सुद्धा खूपच गंभीर आहे. यामुळे अनेकांच्या किडन्या गेल्यात. सरपंचांनी सुद्धा ग्रामपंचायत तर्फे अनेक वेळेस स्थानिक आमदारांना निवेदने दिली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 'पाईपलाईन ही जवळच चार किलोमीटरवर आहे. पण अजूनही चिंचोली गावापर्यंत ती पोहोचली नाही.' असं सरपंच सांगतात.