'लॉकडाऊन तोडणारे यात्रेकरु आणि त्यांना मशिदीत आश्रय देणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी'

 मशिदीच्या कार्यवाहकांवर कारवाई होणार 

Updated: Apr 5, 2020, 07:07 PM IST
'लॉकडाऊन तोडणारे यात्रेकरु आणि त्यांना मशिदीत आश्रय देणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी' title=

लातूर : लॉकडाऊन तोडून नीलंग्यात जाणारे यात्रेकरु कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी हा प्रकार समोर आला होता. 

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला. असे असताना देखील हे आदेश न जुमानता, जमावबंदीचा आदेश लागू असताना २ एप्रिलच्या मध्यरात्री लातूरची सीमा ओलांडून काहीजण निलंगा येथे पोहोचले. यापैकी आठ यात्रेकरू करोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब समोर आली होती.

लॉकडाऊनच्या काळात हे यात्रेकरू निलंगा येथील मशिदी राहीले होते. पाचपेक्षा जास्त माणसांनी एकत्र येऊ नये असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले होते. तसेच अशाप्रकारचे संशयित आढळल्यास त्याची माहिती संबंधितांनी पोलीस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते. पण असे न झाल्याने मशिदीच्या कार्यवाहकांवर कारवाई होणार आहे.