शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : नेहमीच मोठ-मोठ्या नेत्यांचे किंवा घरातील सदस्यांचे वाढदिवस आपण साजरे करीत असतो. मात्र लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गाईचा पहिला वाढदिवस साजरा केलाय. यावेळी त्यांनी गाईपुढे केक कापून, संपूर्ण ग्रामस्थांना जेवणही दिलं. कोण आहेत ते शेतकरी आणि कोणतं आहे ते गावं पाहुयात एक रिपोर्ट
लातूरच्या निलंगा तालुक्यामधल्या लिंबाळा गावातल्या रमेश नाईकवाडेंनी आपल्या गुलाबो नावाच्या गायीचा थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी त्यांनी पत्रिकाही छापल्या होत्या. गावात, निलंगा तालुक्यात तसंच लातूर जिल्ह्यातही प्रतिष्ठितांना वाढदिवसाचं निमंत्रण पाठवलं... खास शामियानाही थाटलाय... यावेळी गाईची विधिवत पूजा करण्यात आली आणि केकही कापण्यात आला.
वाढदिवस पार पडल्यानंतर निमंत्रितांसाठी बोरसुरीच्या डाळीचं वरण आणि भाकरीचा चमचमीत बेतही आखला होता... यावेळी उपस्थितही या कार्यक्रमानं भारावून गेले होते.
माणूस माणसाचा वैरी झाल्याचं आपण अनेक ठिकाणी पाहतो. मात्र रमेश नाईकवाडे या शेतक-यांसारखे आजही अनेक जण आहेत जे आपल्या मुक्या जनावरांवर निखळ प्रेम करतात... त्यामुळे अशा अनोख्या वाढदिवसाची चर्चा तर होणारंच