सांगली : दिल्लीतल्या शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीमारीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्या विरोधात सांगलीत आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केलं.
भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण असल्याची टीका करत जळगावात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. महात्मा गांधींच्या जयंतीला दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावर पाशवी बळाचा वापर केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय.
शेतकरी अडचणीत असून येत्या डिसेंबर महिन्यात शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात लाखोंच्या संख्यने शेतकऱ्यांनी जमा होऊन सरकारच्या विरोधात आवाज उठवावा असंही आवाहन यावेळी करण्यात आलं.