Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात मोठं शक्तिप्रदर्शन

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात मोठं शक्तीप्रदर्शन शिंदे यांच्या घराबाहेर दिसत आहे.

Updated: Jun 25, 2022, 06:23 PM IST
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात मोठं शक्तिप्रदर्शन title=

ठाणे : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या समर्थनार्थ ठाण्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जातं आहे. खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी झाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमले असून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला जात आहे.

आज शिवसेनेच्या बैठकीत, आधी नाथ होते, आता दास झाले, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले होते. शिवसेना निखारा आहे, त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू... हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, असा घणाघात त्यांनी बंडखोरांवर केला. 

एकनाथ शिंदे यांचं नेतेपद आणि बंडखोर आमदारांची पक्षातली पद रद्द केली जाऊ शकतात. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत. शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होतेय. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि राहील, मराठी अस्मितेशी प्रतारणा करणार नाही, असा ठराव या बैठकीत करण्यात आलाय. 

एकनाथ शिंदे गटानं शिवसेना बाळासाहेब गट असं नाव ठेवलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या बैठकीत हा ठराव करण्यात आलाय.  

एकीकडे बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक होत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाथ देखील बॅनरबाजी सुरु झाली आहे.