पैलवानास्नी फुटलाय घाम; कुस्त्या न्हाईत म्हटल्यावर पैका आनायचा कुटनं? .

 कुस्त्यांच्या निमतानं पैलवानांना चार पैकं मिळाय. पन कोरोनामुळं सगळं मुसळ केरात गेलंया

Updated: Mar 26, 2021, 08:38 PM IST
  पैलवानास्नी फुटलाय घाम; कुस्त्या न्हाईत म्हटल्यावर पैका आनायचा कुटनं? . title=

 कोल्हापूर :   कोरोनामुळं गेल्या वरीसभरापासनं जत्रा, यात्रा, ऊरूस रद्द झाल्यात.  तवा तिथं रंगणारं कुस्तीचं फडबी बंद झाल्यात. या फडावर लय जणांची चुल पेटायची वो.  

 कुस्त्यांच्या निमतानं पैलवानांना चार पैकं मिळाय. पन कोरोनामुळं सगळं मुसळ केरात गेलंया... जीवापाड मेहनत करून, लाल मातीत घाम गाळून शरीर कमावलं. त्यासाठी काय थोडा पैका लागतुय व्हय. 
 
रोजचा यायाम, खुराक, बाकीचा खर्च म्हटलं की महिन्याला चांगलं 15 ते इस हजार रुपयांचा खर्च कुटच गेला नाय. आता कुस्त्याचं फड बंद, कुस्त्या न्हाईत म्हटल्यावर इतका पैका आनायचा कुटनं यानंच आता पैलवानास्नी घाम फुटलाय.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी माती विभागात निवड झाल्यालं पैलवान अरुण बोगार्डे यांस्नीनीबी आता हीच चिंता सतावतीया.

 राज्यात फेब्रुवारी ते मे महिना म्हटला की समदीकडं यात्रा न् जत्रांचा सिझन. यात्रा म्हटलं की कुस्त्या आल्या आणि कुस्त्या झाल्या की पैका येतो. पण आवंदा ना जत्रा ना स्पर्धा.. पैकाबी नाय. त्यामुळं आता बास झाली कुस्ती आसं घरचीच म्हणाय लागल्यात. 

 पैलवान दिसाय आडदांड आणि पैकंवालं दिसत्यात. पन कुस्ती हे येकच त्यांच्या कमाईचं साधन बी आसतंय. कुस्त्याच हुईना झाल्यात त्यामुळं अनेक मल्ल आखाडं सोडून घराचा रस्ता धरायलेत. 
 
 कोरोनामुळं मर्दांची कुस्ती पार घायकुतीला आलीय. आता लाल मातीतली कुस्ती टिकावी म्हणून काही संस्था आणि दानशूर मदत करत्यात. पन फाटक्या झोळीला ठिगळं तरी किती जोड़णार. त्यामुळं कळना झालंय ही लाल मातीतली कुस्ती जगवायची तरी कशी?