Kurla BEST Bus Accident Real Reason: कुर्ल्यामध्ये बेस्ट बस अपघातात मरण पावलेल्यांची संख्या 6 वर पोहचली आहे. सोमवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातामध्ये भरधाव वेगातील बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात जखमी असलेल्यांची संख्या 49 वर पोहचल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकीकडे या अपघातातील मृतांची संख्या वाढत असतानाच अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दलचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काही प्रसारमाध्यमांमध्ये सदर चालकाने मद्यपान केलेलं असे दावे करण्यात आले आहे. असं असलं तरी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी या घटनेसंदर्भात प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नेमकं काय झालं आणि एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावर बेस्टची बस इतक्या वेगाने का धावत होती यामागील कारण सांगितलं आहे.
कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या अपघातात बेस्ट बसनं सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पुढची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. काही वेळापूर्वी घटनस्थळी फॉरेन्सिकच्या टीम दाखल झाली असून या ठिकाणी पंचनामा करण्यात येत आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात बस चालकाबाबत माहिती समोर आली आहे. चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती मिळत आहे. चालकाचे वय 54 वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता. पोलिसांच्या प्रथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता या बस चालकाच्या नियुक्तीवरुन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपघातानंतर समोर आलेल्या व्हिडीओंनंतर या चालकाने मद्यपान केल्याचे आरोप केले जात होते. असं असलं तरी या प्रकरणातील सत्य आता शिवसेनेच्या आमदाराने सांगितलं आहे.
नक्का पाहा >> Video: कुर्ल्यातील BEST BUS अपघाताचे CCTV फुटेज; अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेरात कैद
शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी या दुर्घटनेसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना हा अपघात ब्रेक निकामी झाल्याने झाल्याची माहिती दिली. घाबरलेल्या बस चालकाने बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर चुकून एस्कलेटर दाबला, असं लांडे म्हणाले. "कुर्ला स्थानकावरुन सुटलेल्या बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे चालक घाबरला आणि त्याने ब्रेक दाखवण्याचा प्रयत्न करताना चुकून एस्कलेटर दाबला. त्यामुळे बसचा वेग वाढला. त्याला बसवर नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्याने 30 ते 35 जणांना उडवलं. अनेकांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सायन रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत," असं लांडे म्हणाले. त्यामुळेच बस चालकाने मद्यपान केलं होतं हा दावा चुकीचा असल्याचं समोर येत आहे.
नक्का वाचा >> Kurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या दुप्पट! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं काय
#WATCH | Dilip Lande, Shiv Sena MLA says, " A bus which left from Kurla Station, its brake got failed and the driver lost the control of the bus. Driver got scared and instead of pressing the brake, he pressed the accelerator and the speed of the bus increased. He couldn't… https://t.co/aYuqFfk6Ks pic.twitter.com/wLu8iqXsJX
— ANI (@ANI) December 9, 2024
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, "कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर रोड येथे भरधाव बेस्ट बसने धडक दिल्याने 20 जण जखमी झाल्याचे तसेच तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. जखमींना वेळेत उपचार मिळून लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! ह्या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी," अशी मागणी केली आहे.