मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांची एक्स्प्रेससाठी आरक्षित तिकीट काढण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. यंदा गणरायांचं आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार असून रेल्वेच्या नियमानुसार चार महिने आधी आरक्षण करता येत असल्यानं आतापासून चाकरमानी तिकीटं काढत आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. खासगी वाहनं, एसटी, लक्झरी बसेसप्रमाणेच एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठीही झुंबड उडते. त्यात रेल्वे प्रवासाला सर्वाधिक पसंती दिली जाते.
या संपूर्ण कालावधीत जादा गाड्या सोडूनही गाड्यांना चांगलीच गर्दी असते. गणेशोत्सवासाठी कोकण आणि मध्य रेल्वेवरून नियमित फेऱ्यांप्रमाणेच जादा गाड्या सोडल्या जातात. तिकीट खिडक्यांप्रमाणेच ऑनलाइन तिकीट आरक्षण अक्षरश: दोन मिनिटांत फुल्ल होत असल्यानं हजारो इच्छुक प्रवाशांना प्रवासासाठी अन्य पर्याय शोधावे लागतात. यामुळे आतापासूनच तिकीट आरक्षित करण्यासाठी चाकरमान्यांनी लगबग सुरु केली आहे.