Vande Bharat Train: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ होत आहे. आज देशाला सहा वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यातील एक आपल्या महाराष्ट्रासाठी असून कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणार आहे. आज सोमवारपासून आठवड्यातून तीन वेळा वंदे एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन पद्धतीने वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.व्ही.सोमण्णा यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता कोल्हापुरच्या शाहू महाराज टर्मिनसवरुन वंदे भारतचा प्रवास सुरू होणार आहे.
कोल्हापूर-पुणे वंदे भारत ट्रेनची काही दिवसांपूर्वीच चाचणी पार पडली होती. त्यानंतर आज 16 सप्टेंबर रोजी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ होणार आहे. कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटणार आहे. दुपारी दीड वाजता ही गाडी पुणे स्टेशनवर पोहोचणार आहे. तर पुण्यावरून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार आहे ती सायंकाळी 7:40 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानाकावर पोहचणार आहे.
वंदे भारतमध्ये एकूण 530 सीट असून त्यातील 52 सीट या एक्झुकेटिव्ह क्लासच्या सीट आहेत. तसंच, कोल्हापूर-पुणे या प्रवासात ट्रेन मिरज,सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा असेल. तसंच, वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आठ कोच असतील. कोल्हापूर-पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी 1160 रुपये तर एक्झिक्युटिव्हसाठी 2005 रुपये असं तिकिट असणार आहे. वंदे भारतमुळं कोल्हापूरकरांचा प्रवास सुस्साट होणार आहे. 5 तासांत प्रवास पूर्ण होणार आहे.
कोल्हापूर पुणे वंदे भारत सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरातून निघेल त्यानंतर मिरजमध्ये 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42, कराड 10.07, सातारा 10.47 आणि पुण्यात दीड वाजता पोहोचणार आहे.
पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल. साताऱ्यात 4.37 कराड 5.25, किर्लोस्करवाडीत 5.50, सांगली 6.18, मिरजेत 6.40 तर कोल्हापुरात 7.40 ला पोहोचेल.