रांगड्या कोल्हापूरचा तरुण ठरला 'मिस्टर गे इंडिया'; साऊथ आफ्रिकेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

Kolhapur News : लैंगिक अल्पसंख्याक म्हणजेच समलिंगी अथवा तृतीयपंथी लोकांकडे तुच्छतेने पाहिले जाते, अशी खंत देखील विशाल पिंजानी यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता विशाल पिंजानी जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करणार आहे.

प्रताप नाईक | Updated: Oct 7, 2023, 04:08 PM IST
रांगड्या कोल्हापूरचा तरुण ठरला 'मिस्टर गे इंडिया'; साऊथ आफ्रिकेत करणार भारताचं प्रतिनिधित्व title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरचा (Kolhapur News) विशाल पिंजानी (Vishal Pinjani) 'मिस्टर गे इंडिया' (Mr Gay of India) ठरला आहे. 'मिस्टर गे इंडिया' आणि मिस्ट एलजीबीटी यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेत त्याने हा किताब पटकावला आहे. तर केरळच्या अभिषेक जयदीप याने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. आता तो मिस्टर वर्ल्ड गे स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. साऊथ आफ्रिका येथील केप टाऊन येथे मिस्टर वर्ल्ड गे स्पर्धा होणार आहे.

पुणे येथे 5 ऑक्टोबरला रंगारंग सोहळ्यात कोल्हापूर आणि परिसरात एलजीबीटीक्युआयएप्लस समुदायासाठी 'अभिमान' या स्वयंसहाय्यता गटाद्वारे कार्य करणाऱ्या विशालला सर्व परीक्षकांनी पहिली पसंती दिली. विशालमध्ये लहानपणापासून समलैगिकतेची भावना होत्या. अकरावी, बारावीला असताना मित्रांनी त्रास दिल्याने त्याने शिक्षण सोडले होते. तेव्हा त्याने या चुकीच्या समजाविषयी माहिती घेतली. जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार नसून ती एक नैसर्गिक भावना असल्याचे जाहीर केल्यानंतर घरच्यांनीही विशालला स्वीकारले.

विशालने अभिमान या संस्थेमार्फत  2017 पासून कोल्हापूर जिल्ह्यातील काम करायला सुरुवात केली होती. 5 ऑक्टोंबर रोजी पुणे येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवला होता. या सोहळ्यात अनेक समलिंगी पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी शारीरिक तंदुरुस्ती, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा सोबतच एलजीबीटीक्यूआयएप्लस समुदायासाठी केलेले सामाजिक कार्य हे निकष होते. भारताच्या विविध प्रांतातून सहभागी झालेल्या स्पर्धकांतून निवडक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले.

विशाल एकेक फेरी पार करत अंतिम फेरीत पोहोचला होता. परीक्षकांचे गुण आणि वेबसाइटद्वारे लोकांनी दिलेली मते विचारात घेऊन अंतिम निकाल दिला गेला. समलिंगी असल्याचं जाहीरपणे सांगणारे राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला मिस्टर गे इंडियाचा किताब देण्यात आला. विशाल 'मिस्टर गे इंडिया' ही स्पर्धा जिंकून आता साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन येथे होणाऱ्या 'मिस्टर वर्ल्ड गे' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशालने या यशासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या त्याच्या कुटुंबीयांचे तसेच मित्रमंडळी, अभिमानचे सदस्य , जिल्हा एडस् नियंत्रण पथक कोल्हापूर आणि एलजीबीटीक्युआयएप्लस समुदायातील सर्वांचे आभार मानले आहेत.