प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : रस्ते अपघातामुळे (Road Accident) देशासह राज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेकदा वाहन चालकांच्या चुकीमुळे रस्ते अपघातात सामान्यांचा बळी जातो. तर कधी पादचाऱ्यांच्या चुकीमुळेही अशा प्रकारचे अपघात होत असतात. दरम्यान, पन्हाळगडावर अशाच एका अपघातात दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur news) पन्हाळगड (panhala fort) पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील बालकाचा भरधाव फोर व्हीलर गाडीखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
पन्हाळगडावरील तबक उद्यान समोरील रस्त्यावरील ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर दबडे कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर एकच आक्रोश केला. कुटुंबियांचा आक्रोश पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.
भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी आले होते. पन्हाळागडावर पर्यटनासाठी आलेले दबडे कुटुंबीय चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दोन वर्षांच्या इंद्रनील अरुण दबडे याने आईचा हात सोडून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी येणाऱ्या भरधाव फोर व्हिलरने इंद्रनीलला उडवले. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये इंद्रनीलचा मृत्यू झाला. अपघातानंतर इंद्रनीलला रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र त्याचा दुर्दैवी झाला.
दरम्यान, इंद्रनीलच्या मृत्यूची बातमी समजताच दबडे कुटुंबियांचा अश्रुंचा बांध फुटला. इंद्रनीलचा मृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश अनावर झाला. हा दबडे कुटुंबीयांनी पन्हाळा इथल्या रुग्णालयामध्ये केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता.
बीडमध्ये वीज कोसळून दोन महिला शेतकऱ्यांचा मृत्यू
राज्याच्या काही भागात कडाक्याचे ऊन पडलेले असताना काही ठिकाणी अद्यापही अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही अवकाळी पाऊस कोसळत आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. याच अवकाळीमुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. आष्टी तालुक्यातील केरुळ आणि सांगवीत वीज कोसळून दोन महिला शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. काजल माळी आणि राणी सावंत अशी मृत्यू झालेल्या महिला शेतकऱ्यांची नावे आहेत. वीज पडून दोन महिला दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बीड शहरासह अनेक परिसरातील मुसळधार पावसामुळे अजूनही विद्युत पुरवठा खंडित आहे