आधी स्टेरॉइड देऊन सवय लावायची अन् नंतर... कोल्हापुरात जिममध्ये सुरु होता धक्कादायक प्रकार

Kolhapur Crime News : कोल्हापुरमध्ये जिम चालणारा तरुणाईच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीममध्ये धोकादायक औषधे देणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.

प्रताप नाईक | Updated: Feb 23, 2024, 05:08 PM IST
आधी स्टेरॉइड देऊन सवय लावायची अन् नंतर... कोल्हापुरात जिममध्ये सुरु होता धक्कादायक प्रकार title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जिममध्ये व्यायाम करणारी तरुणाई ही सुदृढ शरीर बनविण्यासाठी मेफेनटेरमाईन सल्फेट सारख्या औषधाचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही औषधे विक्री करणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलीसांनी अटक केली आहे.

कमी दिवसात बॉडी बिल्डर व्हायच आहे, मग घ्या मेफेनटेरमाईन सल्फेट सारखे धोकादायक इंजेक्शन टोचून असा काहीसा प्रकार कोल्हापुरात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश बॉडी बिल्डिंग करणारे तरुण या इंजेक्शनच्या फेऱ्यात आडकले असल्याची शक्यता आहे. जिम ट्रेनर व्यायाम करण्याबरोबर हे इंजेक्शन घेतलं तर तुम्ही काही दिवसात बॉडी बिल्डर बनाल असा अपप्रचार करून युवा पिढी बरबाद करण्याचं कटकारस्थान करत आहेत. 

कोल्हापूर शहराजवळील कळंबा गावात असणारे एस प्रोटीन्स व एस फिटनेस जीमचा मालक प्रशांत मोरे हा त्या पैकीच एक. प्रशांत मोरे हा जिममध्ये शरीरास घातक असणारे मेफेनटेरमाईन सल्फेट हे इंजेक्शन विक्री करतो अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी छापा टाकून जिम आणि दुकानाची झडती घेतली. त्यावेळीं मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्रीकरीता ठेवले असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी जिम आणि दुकाच्या झडतीत एकूण 39 हजार 922 रुपये किमतीच्या मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 64 बाटल्या जप्त केल्या आहेत. इंजेक्शन वापरण्यासाठी लागणाऱ्या सिरींज व इतर साहित्य जप्त करून प्रशांत मोरे आणि त्याचा साथीदार ओंकार अरुण भोई या दोघांना अटक करण्यात आळी आहे. नवख्या बॉडी बिल्डरला सवय लागेपर्यंत आहे त्याच किमतीत म्हणजे 650 रुपयाला इंजेक्शन देण्यात येतं. त्यानंतर या इंजेक्शनच्या आहारी गेल्यानंतर हेच इंजेक्शन 900 ते 1000 रुपये किमतीला विकलं जात असल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे.

आजची तरुणाई ही व्यसनांच्या आहारी जात आहे आणि त्याचे दुष्पपरिणाम हे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर होत असतात. ही अतिशय गंभीर बाब असताना देखील व्यायाम शाळा आणि जिम सारख्या ठिकाणी शरीराला हानी पोहोचवणारे इंजेक्शन सर्रास वापरले जात आहेत. त्यामुळेच जिम करणारा आपला मुलगा या इंजेक्शनच्या आहारी तरी गेला नाही ना याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शरीरावर वाईट परिणाम होऊन हा तरुण व्यसनाच्या आहारी जायला वेळ लागणार नाही.

दरम्यान, या इंजेक्शनच्या आहारी गेलेल्या तरुणांने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली, त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत ही कारवाई केल्याची माहिती आहे. सध्या कोल्हापूर शहरातील एका जिम वर कारवाई झाली आहे,पण अशा प्रकारचा इंजेक्शनचा वापर आणखी कोण कोण करत आहे याच्या मागावर पोलीस आहे. करणारे अनेक जिम सध्या पोलिसांच्या रडावर आहेत.