राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

: माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Updated: Jan 26, 2021, 02:35 PM IST
राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल  title=

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कृषी कायद्याला विरोधासाठी काल स्वाभिमानीनं सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. चार दिवसापूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांनी गर्दीचे कार्यक्रम घेतले त्यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल राजू शेट्टींनी विचारला आहे. काँग्रेस रसातळाला गेली आहे. आता राहिलेले अवशेष जपा नाही तर ती देखील संपून जाईल,  असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. वेगवेगळ्या वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, या मोर्चाला शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढत ते सहभागी झाले आहेत. सांगलीतून सकाळी निघालेली ही ट्रॅक्टर रॅली कोल्हापूरात दाखल झाली आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागण्यासाठी ही स्वाभिमानीची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. या ट्रॅक्टर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.