शेतकऱ्याकडे मुलाच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी मागितली, अखेर नको तेच झालं...

खंडणीखोरांची आता शेतकऱ्यांवरही नजर, मुलाच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी, आणि तो परतेल...

Updated: Feb 24, 2022, 07:14 PM IST
शेतकऱ्याकडे मुलाच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी मागितली, अखेर नको तेच झालं... title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना गोंदियात उघडकीस आली आहे. गोंदियातील आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे. 

22 फेब्रुवारीला 17 वर्षांचा चेतन नरेश खोब्रागडे मावशीच्या गावी जाण्यासाठी निघाला. पण तो तिथपर्यंत पोहचलाच नाही. घरी न पोहचल्याने रात्री कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. पण चेतनचा कुठेच थांगपत्ता नव्हता. अखेर चेतनच्या वडिलांनी आमगाव पोलीस स्थानकात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 

रात्री उशीरा चेतनच्या वडिलांच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरुन फोन आला. चेतनचं अपहरण करण्यात आलं असून त्याला सोडण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. चेतनच्या वडिलांना तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मोबाईल नंबरवरुन त्या व्यक्तीचा शोध घेतला खरा पण त्या व्यक्तीच्या नावाने अपहरकर्त्याने बनावट सीम कार्ड वापरल्याचं पोलीसांच्या तपासात समोर आलं. 

यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरु केलं. यासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात आली.  बोदा इथल्या एका शेतात ढिगाऱ्याखाली चेतनचा मृतदेह सापडला. चेतनची चप्पल तणसाच्या ढिगाऱ्याच्या बाहेर सापडली. त्या चप्पलजवळ जाऊन श्वान थांबला. पोलिसांनी तणसच्या ढिगाऱ्यात शोध घेतला असता चेतनचा मृतदेह आढळला.

चेतनची हत्या कोणी केली, तो चेतनच्या ओळखीचा होता का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.